महाराष्ट्रात ५ महिन्यांत ३९ लाख मतदार कसे वाढले ? राहुल गांधींचा निवडणूक आयोगाला थेट सवाल !

Sushant Kulkarni
Published:

८ फेब्रुवारी २०२५ नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या पाच महिन्यांत झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत तब्बल ३९ लाख नवीन मतदार वाढले कसे ? असा थेट सवाल लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी मुख्य निवडणूक आयोगाला केला.महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अनियमितता झाल्याचा आरोप लावत त्यांनी राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळी वापरलेल्या मतदार याद्या उपलब्ध करून देण्याची मागणी आयोगाकडे केली.

आयोगाने ही माहिती दिली नाही तर न्यायालयात जाण्याचा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, राहुल गांधी यांनी लावलेल्या आरोपांवर तथ्य आधारित लिखित उत्तर दिले जाईल,असे प्रत्युत्तर लागलीच आयोगाने दिले.काँग्रेस नेते राहुल गांधी उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत विधानसभा निवडणुकीतील अनियमिततेवरून निवडणूक आयोगावर हल्ला चढवला.

लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीवेळेच्या मतदार संख्येतील तफावतीवर बोट ठेवत राहुल गांधींनी आयोगावर प्रश्नांचा भडिमार केला. महाराष्ट्रातील मतदारांची संख्या येथील प्रौढ लोकसंख्येपेक्षा अधिक आढळून आल्याचा दावाही त्यांनी केला.विधानसभा निवडणूक २०१९ ते लोकसभा निवडणूक २०२४ दरम्यान राज्यात ३२ लाख नवीन मतदारांची भर पडली होती.

पण लोकसभा निवडणूक ते २०२४ च्या विधानसभा निवडणुकी दरम्यानच्या अवघ्या पाच महिन्यांत ३९ लाख नवे मतदार यादीत समाविष्ट झाले.आधीच्या पाच वर्षांच्या तुलनेत अवघ्या पाच महिन्यांत इतक्या संख्येने मतदार कसे जोडण्यात आले. लोकसभा निवडणुकीनंतर अधिक मतदार का जोडले गेले ? हे ३९ लाख व्यक्ती कोण आहेत आणि कोठून आले आहेत ? असे प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केले.

लोकसभा व विधानसभेदरम्यानच्या काळात वाढलेली ही मतदार संख्या संपूर्ण हिमाचल प्रदेशमधील मतदार संख्येइतकी आहे, असे ते म्हणाले. महाराष्ट्रातील १८ वर्षांवरील वयाची एकूण लोकसंख्या ९.५४ कोटी आहे. पण विधानसभेतील मतदारांची संख्या ९.७ कोटी आहे. प्रौढ लोकसंख्येपेक्षा मतदारांची संख्या अधिक कशी ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.त्याचबरोबर राज्यातील वास्तविक मतदारांपेक्षा नोंदणीकृत मतदारांची संख्या अधिक आहे.

या तफावतीमुळे हे मतदार कोठून आले,असा प्रश्न निर्माण होत असल्याचे राहुल गांधी म्हणाले.वाढलेले बहुतांश मतदार हे भाजपच्या बाजूने गेले.तर विरोधी पक्षांनी आपल्या मतांची टक्केवारी कायम राखल्याचे सांगत त्यांनी कामठी मतदारसंघात काँग्रेसला लोकसभा व विधानसभा निवडणुकीदरम्यान पडलेल्या मतांचा दाखला दिला.विरोधकांकडून वारंवार मागणी करून देखील आयोग महाराष्ट्रातील मतदारांची माहिती उपलब्ध करून देत नसल्याने यात काही तरी गैरप्रकार झाल्याचे दिसून येत आहे.

तसेच मोठ्या संख्येने मतदारांची नावे हटवण्यात आली.यामध्ये प्रामुख्याने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि अल्पसंख्याक समुदायातील मतदारांचा समावेश आहे,असा दावा त्यांनी केला.त्यामुळे आयोगाने लोकसभा व विधानसभा निवडणुकीवेळी वापरलेल्या मतदारांची यादी त्यांची नावे,छायाचित्रे व पत्त्यांसह उपलब्ध करून दिली पाहिजे.ही त्यांची जबाबदारी आहे, असे राहुल गांधी म्हणाले.

तर आयोग विरोधकांच्या प्रश्नांची उत्तरे देणार नाही.कारण ते सरकारचे गुलाम झाल्याची कडवी टीका संजय राऊत यांनी केली.महाराष्ट्रात जी ३९ लाख बनावट मते पडली आहेत,ती आता बिहारमध्ये जातील.यानंतर याच पद्धतीने ती वेगवेगळ्या निवडणुकीत फिरत राहतील,असा टोला त्यांनी मारला.

माळशिरस मतदारसंघात आपल्या पक्षाचे उत्तम जानकर निवडून आलेले असताना सुद्धा ते मतपत्रिकेवर मतदान घेण्याची मागणी करत असल्याकडे लक्ष वेधत सुप्रिया सुळे यांनी निवडणुकीतील अनियमिततेवर टीका केली. निवडणूक चिन्हातील संभ्रमामुळे ११ जागांवर आपल्या पक्षाच्या उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला. ‘तुतारी’ निवडणूक चिन्ह बदलण्यासाठी आम्ही अनेक वेळा विनंती केली, पण त्याचा विचार आयोगाने केला नसल्याचा आरोप सुळे यांनी लावला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe