आजच्या काळात अगदी कमी अंतराच्या प्रवासासाठीही प्रवाशांना भाडे भरावे लागते, मात्र तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की भारतात एक अशी ट्रेन आहे जिथे कोणत्याही प्रकारचे भाडे नाही, तिकीट घ्यावे लागत नाही आणि टीटीई देखील नाही. गेल्या ७५ वर्षांपासून ही ट्रेन प्रवाशांसाठी मोफत सेवा देत आहे.
ही अनोखी ट्रेन भाक्रा-नांगल ट्रेन म्हणून ओळखली जाते. १९४८ साली पहिल्यांदा ही ट्रेन धावली आणि त्यावेळी भाक्रा-नांगल धरणाच्या बांधकामासाठी कामगार आणि आवश्यक वस्तू वाहून नेण्याच्या उद्देशाने ती सुरू करण्यात आली होती. मात्र, धरणाचे काम पूर्ण झाल्यानंतरही ही ट्रेन बंद करण्यात आली नाही. स्थानिक लोकांना मोफत प्रवासाची सुविधा मिळावी म्हणून ती आजही कार्यरत आहे. विशेष म्हणजे, भारताच्या सर्वात उंच धरणांपैकी एक असलेल्या भाक्रा-नांगल धरणाच्या इतिहासाचा साक्षीदार म्हणून ही ट्रेन कार्यरत आहे.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2025/02/Ahmednagar-News-2025-02-08T174354.115.jpg)
१३ किलोमीटर प्रवास, निसर्गाचा अद्भुत अनुभव
ही ट्रेन पंजाबमधील नांगल ते हिमाचल प्रदेशातील भाक्रा असे १३ किलोमीटरचे अंतर कापते. या छोट्या प्रवासादरम्यान ट्रेन तीन बोगद्यांमधून जाते आणि सहा स्थानकांवर थांबते. प्रवाशांना या प्रवासात सतलज नदीच्या सुंदर दृश्यांचा आनंद घेता येतो, तसेच शिवालिक टेकड्यांचे नयनरम्य दृश्य पाहता येते.
ही ट्रेन भारतीय रेल्वे अंतर्गत नाही !
ही ट्रेन भारतीय रेल्वेने नाही चालवत, तर भाक्रा बियास व्यवस्थापन मंडळ (BBMB) द्वारे तिचे संचालन केले जाते. भाक्रा-नांगल धरणाच्या ऐतिहासिक वारशाला जपण्यासाठी आणि स्थानिक लोकांना सुविधा देण्यासाठी बीबीएमबीने ही सेवा मोफत ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
७५ वर्षांपासून मोफत सेवा, तरीही भाडे घेतले जात नाही
ही ट्रेन चालवण्यासाठी ताशी १८-२० लिटर डिझेलचा खर्च येतो, तरीही बीबीएमबीने कधीही भाडे आकारण्याचा विचार केला नाही. स्वातंत्र्यानंतर भारताच्या औद्योगिक प्रगतीचा आदर करण्यासाठी आणि स्थानिक लोकांना मोफत प्रवासाची सुविधा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
पाकिस्तानात तयार झालेले डबे आजही कार्यरत!
प्रारंभी ही ट्रेन वाफेच्या इंजिनावर चालत होती, मात्र १९५३ मध्ये तिला डिझेल इंजिन देण्यात आले. या ट्रेनमध्ये बसवलेले लाकडी डबे पाकिस्तानातील कराची येथे तयार करण्यात आले होते. विशेष म्हणजे, आजही हेच डबे वापरण्यात येत आहेत.
भाक्रा-नांगल ट्रेन: इतिहासाचा साक्षीदार
हा प्रवास केवळ एका ट्रेनमध्ये बसून केलेला प्रवास नसून, भारताच्या ऐतिहासिक औद्योगिक प्रगतीचा एक भाग अनुभण्याची संधी आहे. हा प्रवास स्थानिकांसाठी मोफत सुविधा असली तरी देशाच्या ऐतिहासिक क्षणांना साक्षीदार ठरणारी एक अनोखी परंपरा आहे.