११ फेब्रुवारी २०२५ राहुरी : राहुरी फॅक्टरी परिसरात एकाच रात्री बंद अवस्थेतील दोन घरे व एक हॉटेल फोडून अडीच ते तीन लाखांचा ऐवज चोरी गेला. आठवडे भरातील घरफोडीची ही तिसरी घटना घडल्याने फॅक्टरी परिसरात चोरट्यांची दहशत वाढली. पहिली घटना राहुरी फॅक्टरी येथील नर्सिंग होम कॉलनीत घडली.
अज्ञात भामट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश मिळवत कपाटातील दीड लाख रुपये किंमतीचे सव्वादोन तोळे सोने-चांदीच्या दागिन्यासह रोख रक्कम चोरून नेले. या घटनेबाबत वर्षा शेखर शेजूळ यांनी राहुरी पोलिसात फिर्याद दिल्याने अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दुसरी घटना राहुरी फॅक्टरी येथील सरस्वती कॉलनीत घडली.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2025/02/ईव्हीएम-मशिनची-पडताळणी-होईल-66.jpg)
अज्ञात भामट्यांनी धाडगे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून कपाटातील सोन्याची अंगठी, कानातील डूल, रिंगा असे १९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने, एक मोबाईल व २ हजारांची रक्कम असा दोन लाखांचा ऐवज चोरून नेला. तिसरी घटना राहुरी फॅक्टरी परिसरातील वाणी मळ्याजवळ घडली.
बंद असलेले जगदंब हॉटेल अज्ञात भामट्यांनी फोडून हॉटेलमधील भांड्याचा सेट, गॅस शेगडी, फ्रीज तसेच डिफ्रीज हे साहीत्य चोरुन नेले. हॉटेल चालक अजित वने यांनी राहुरी पोलिसात फिर्याद दिल्याने अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.