११ फेब्रुवारी २०२५ करंजी : नगर- पाथर्डी मतदारसंघाचे आमदार व जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले मणक्याच्या शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे अनुपस्थितीत बुऱ्हाणनगर येथे आयोजित जनता दरबारात भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले यांनी सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सोडवल्या.
जनता दरबारात कर्डिले यांनी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन करत मी अक्षय कर्डिले बोलतोय… म्हणत आलेल्या नागरिकांच्या प्रश्नाची सोडवणूक करत आपल्यावर पडलेली जबाबदारी प्रामाणिकपणे व मोठ्या खुबीने पार पाडरण्याचा प्रयत्न केला. जनता दरबाराच्या माध्यमातून आलेल्या प्रत्येक व्यक्तीची विचारपूस करत त्यांना साहेबांच्या अनुपस्थितीमध्ये सन्मानपूर्वक वागणूक देण्याचा पुरेपूर प्रयत्न अक्षय कर्डिले यांनी या निमित्ताने केला.
दररोज मतदारसंघातील नियोजित कार्यक्रमालादेखील हजेरी लावून संयोजकांना समाधानी ठेवण्याचे काम अक्षय कर्डिले यांनी केले. दिवसभरात अनेक विवाहसोहळ्यांना हजेरी लावणे तसेच तर इतरही लोकांच्या भेटीगाठीचे कार्यक्रम अगदी सुरू आहेत.
आ. कर्डिले कधीही इतके दिवस जनसामान्यांच्या संपर्कातून बाहेर राहिलेले नाहीत, त्यांच्या राजकीय आयुष्यातील बहुदा ही पहिलीच घटना असेल की त्यांना एका शस्त्रक्रियेमुळे जनसामान्यांपासून इच्छा नसताना देखील काही दिवस डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे विश्रांती घेण्याची वेळ आली.
आठ पंधरा दिवसांमध्ये आ. कर्डिले हे पुन्हा एकदा नव्या जोमाने जनसामान्यांच्या सेवेसाठी सक्रिय होणार आहेत. असे असले तरी युवानेते अक्षय कर्डिले हे त्यांच्यावर पडलेली जबाबदारी निश्चित यशस्वीपणे पार पाडताना दिसत आहेत. यापूर्वी देखील अक्षय कर्डिले यांनी सामाजिक, राजकीय कामाच्या माध्यमातून हजारो तरुणांना आपल्याशी जोडले असून, त्यांचादेखील जनसंपर्क मोठा आहे.
परंतु सोबतीला आ. कर्डिले यांचे मोठे पाठबळ राहिले आहे. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे या स्वामी समर्थांच्या वाक्यप्रमाने युवानेते अक्षय कर्डिले एकधाडसी आणि कणखर युवा चेहरा तरुणांना लाभला आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत तरुणांची केलेली एकजूट अक्षय कर्डिले यांच्या कामी आली.