११ फेब्रुवारी २०२५ वळण : बारागाव नांदूर व इतर १४ गाव पाणी योजनेच्या काल सोमवारी सदस्यांच्या बैठकीत थकित ११ ग्रामपंचायतीकडील ४२ लाख ३९ हजार ३२९ रुपये पैकी सुमारे १२ लाख ५१ हजार रुपयाची वसूली झाल्याने तूर्तास पाणी कपातीचे संकट टळले आहे.आता उर्वरित थकीत रक्कम भरण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतींना २८ फेब्रुवारी पर्यंत मुदत दिली आहे.अशाच प्रकारे लवकरात लवकर उर्वरित भरणा करून योजनेस सहकार्य करावे व आपल्या गावचे पाणी कपातीचे संकट टाळावे, असे आवाहन अध्यक्षांसह सदस्यांनी केले आहे.
बारागाव नांदूर व इतर १४ गाव पाणी योजनेच्या लाभधारक ग्रामपंचायतीकडे मोठ्या प्रमाणावर पाणीपट्टी थकल्याने संस्था चालवणे अडचणीचे झाले होते. विज बिल व पाणी बिल संस्थेला देणे होते. त्यामुळे वसुली करून भरणा करणे गरजेचे असल्याने वसुलीसाठी कडक मोहीम राबविणे गरजेचे होते. त्यानुसार मध्यंतरी १५ जानेवारीला सुमारे सहा दिवस पाणी पुरवठा बंद ठेवून वसूली हाती घेतली होती. तसेच भरणा न करणाऱ्या ग्रामपंचायतीला पाणी पुरवठा बंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यासाठी सन २०२३-२४ ची पूर्ण थकीत रक्कम भरण्यासाठी १० फेब्रुवारी ही अंतिम तारीख देण्यात आली होती.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2025/02/ईव्हीएम-मशिनची-पडताळणी-होईल-78.jpg)
सदर बैठक योजनेच्या अध्यक्षा विद्याताई शिवाजीराजे गाडे यांच्या अध्यक्षतेखाली व गटविकास अधिकारी ए. बी. डी. ओ. सुरेश तायडे, माजी जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे, राजूभाऊ शेटे, कुंडलिक गावडे, रावसाहेब पवार, प्रभाकर गाडे, नंदकुमार डोळस, शिवाजी शेंडे, नितीन कल्हापुरे, साहेबराव म्हसे, गोरक्षनाथ म्हसे, विजय माळवदे, अण्णासाहेब देवरे, राजेंद्र आढाव, अशोक कुलट, कोंडराम विटनोर, शामराव आढाव, रवींद्र म्हसे, गोरक्षनाथ गुंड, दत्तात्रेय विटनोर, वैभव जरे, ग्रामपंचायत अधिकारी पी.एस. चव्हाण, एस.एन. डोंगरे, आर. बी. पवार, एस.के. पल्हारे, ए.एस. भिसे, एस.आर. पालवे, जी.पी. गांधले, एम.टी. राठोड, एम.एन. रगड, के.सी. भिंगारदे, एस.ए. भिंगारदे, सचिव तथा विस्ताराधिकारी टी.बी. कोकाटे, देखभाल समन्वयक शौकत इनामदार आदींच्या उपस्थितीत पार पडली.
योजनेतील समाविष्ट असलेल्या शिलेगाव, केंदळ बुद्रुक, पिंपरी वळण व तांदूळवाडी या ग्रामपंचायतींनी आपल्याकडील सन २०२३-२४ ची सर्व थकीत पाणी पट्टी यापूर्वीच दिलेली आहे. तसेच पुढील सन २०२४-२५ ची चालू मागणीतीलही काही रक्कम भरून योजनेला सहकार्य केले आहे.याबद्दल सदर ग्रामपंचायत तिचे पदाधिकारी व सदस्यांचे अध्यक्ष व सचिव यांनी आभार मानले.राहिलेल्या सर्व ग्रामपंचायतीनी २८ तारखेपर्यंत सर्व थकीत पाणीपट्टी भरून १०० टक्के वसूल करण्याचे आवाहन अध्यक्ष विद्याताई गाडे व गटविकास अधिकारी सुरेश तायडे, सचिव कोकाटे यांनी केले आहे.
बारागाव नांदूरकडे ९ लाख २६ हजार ४४५ रुपये बाकी असून त्यांना २० तारखेपर्यंत ७५ टक्के रक्कम भरण्याची मुदत दिली आहे.डिग्रस ग्रामपंचायतीने आपल्याकडील १ लाख ४३ हजार ७२९ रुपये थकीत असलेली पूर्ण रक्कम भरली आहे.राहुरी खुर्दने आपल्याकडील ११ लाख ३५ हजार ३१६ रुपये पैकी आज ७ लाख रुपये भरले असून २८ तारखेपर्यंत आपण पूर्ण रक्कम भरणार असल्याचे सांगितले.
देसवंडी २ लाख ७१ हजार ५९७ पैकी ५० हजार रुपयांचा चेक जमा केला.कोंडवड ५ लाख ५७ हजार ३४३ पैकी दीड लाख रुपये भरणा केला.केंदळ खुर्द ४ लाख १८ हजार ९३३ पैकी एक लाख भरणा केला.वळण ३ लाख ४५ हजार ४१३ पैकी ५१ हजाराचा भरणा केला.मांजरी गावाने मध्यंतरी पैसे भरल्याने आत्ता एक लाख ४६ हजार ८३ रुपये पैकी २० तारखेला एक लाख रुपये भरणा करणार आहे.
मानोरी २ लाख ९० हजार २०१ रुपये पैकी आज ९० हजार २०१ रुपयाचा चेक दिला.आरडगाव ६१ हजार तीनशे पाच रुपयांचा १२ तारखेचा चेक पूर्ण रकमेचा दिला. या प्रमाणे आज राहुरी पंचायत समितीच्या स्व. दादासाहेब तनपुरे सभागृहात झालेल्या बैठकीत संबंधित ग्रामपंचायतनी थकीत बाकी जमा केली आहे व उर्वरित भरणा करण्यासाठी समितीने २८ फेब्रुवारी पर्यंत मुदत दिलेली आहे.तोपर्यंत कुठल्याही गावचा पाणीपुरवठा खंडित केला जाणार नसल्याचे जाहीर केले.