पुणे रिंग रोड प्रकल्पाबाबत मोठी अपडेट ! भूसंपादन प्रक्रियेला गती मिळणार, शेतकऱ्यांना ‘इतका’ मोबदला

पुणे रिंग रोड प्रकल्प एकूण 128 किलोमीटर लांबीचा असून, तो शहराच्या विविध भागांना जोडणार आहे. या रस्त्याच्या विकासासाठी वेगवेगळ्या संस्थांना जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. परंदवाडी ते सोळू (40 किमी) हा भाग महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) उभारणार आहे. वाघोली ते लोहगाव (5.70 किमी) या भागाची जबाबदारी पुणे महानगरपालिका (PMC) सांभाळणार आहे.

Tejas B Shelar
Published:

Pune Ring Road News : पुणे शहरातील वाहतूक कोंडी आणि वाढत्या ट्रॅफिकच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (PMRDA) महत्त्वाकांक्षी पुणे रिंग रोड प्रकल्प हाती घेतला आहे. हा प्रकल्प शहराच्या वाहतूक व्यवस्थेत लक्षणीय सुधारणा घडवून आणेल, असा विश्वास आहे. प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी आता भूसंपादन प्रक्रियेला गती देण्यात येत असून, यासाठी पीएमआरडीएने 13 प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवले आहेत. हे प्रस्ताव आता जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पुढे पाठवण्यात येतील, तसेच भूमी अभिलेख विभागाकडून संयुक्त मोजणी करून जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.

शेतकऱ्यांना मिळणार 25% अतिरिक्त मोबदला

भूसंपादन प्रक्रियेला जलदगतीने पुढे नेण्यासाठी खासगी वाटाघाटींच्या माध्यमातून भूसंपादन केल्यास शेतकऱ्यांना 25 टक्के अतिरिक्त मोबदला सुद्धा मिळणार आहे. यामुळे प्रभावित होणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीसाठी अधिक लाभदायक दर मिळण्याची शक्यता आहे. पीएमआरडीएकडून दिला जाणारा मोबदला सरासरी बाजारभावाच्या तुलनेत अधिक असेल, त्यामुळे शेतकऱ्यांनी सहकार्य केल्यास त्यांनाही आर्थिकदृष्ट्या फायदा होऊ शकतो. हा निर्णय शेतकरी आणि प्रशासन या दोन्ही पक्षांसाठी फायदेशीर ठरणार आहे.

पुणे रिंग रोडचा संपूर्ण आराखडा आणि प्रकल्पाचे स्वरूप

पुणे रिंग रोड प्रकल्प एकूण 128 किलोमीटर लांबीचा असून, तो शहराच्या विविध भागांना जोडणार आहे. या रस्त्याच्या विकासासाठी वेगवेगळ्या संस्थांना जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. परंदवाडी ते सोळू (40 किमी) हा भाग महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) उभारणार आहे. वाघोली ते लोहगाव (5.70 किमी) या भागाची जबाबदारी पुणे महानगरपालिका (PMC) सांभाळणार आहे.

PMRDA कडून उर्वरित 83.12 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम करण्यात येणार आहे. सुरुवातीला हा रिंग रोड 110 मीटर रुंदीचा असणार होता, मात्र स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांच्या विरोधानंतर प्रशासनाने रस्त्याची रुंदी 65 मीटरपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान तुलनेने कमी होणार आहे आणि प्रकल्प सुलभपणे मार्गी लागणार आहे.

भूसंपादन प्रक्रियेला गती अन मोजणीचे काम अंतिम टप्प्यात

सध्या या प्रकल्पाचा सोळू ते वडगाव शिंदे या 4.70 किलोमीटरच्या अंतरासाठी भूसंपादनाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केला गेला आहे. मोजणी प्रक्रियेची प्राथमिक कामे सुरू असून, हा प्रस्ताव पुढे भूमी अभिलेख विभागाकडे पाठवण्यात आला आहे. येत्या महिन्यात संयुक्त मोजणी प्रक्रिया सुरू होईल, त्यामुळे या प्रकल्पाच्या कामाला मोठ्या प्रमाणात वेग येणार आहे.

पुणे रिंग रोडचे महत्त्व आणि अपेक्षित फायदे

हा रिंग रोड पूर्ण झाल्यास पुणे शहराच्या वाहतूक व्यवस्थेवर मोठा सकारात्मक परिणाम होईल. सध्या पुण्यातील मुख्य रस्ते आणि महामार्गांवर वाहतुक मोठ्या प्रमाणात वाढली आहे अन यामुळे या मार्गावर मोठा ताण आला आहे. पण हा रिंग रोड तयार झाल्यानंतर मुंबई-पुणे, पुणे-सोलापूर, पुणे-बंगळुरू आणि पुणे-नाशिक महामार्गांवरून जाणारी वाहतूक अधिक वेगवान आणि सुलभ होईल.

याशिवाय, पुणे शहरामधून होणारी अवजड वाहनांची रहदारी बाहेरच्या भागात वळवली जाणार आहे, त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल. उद्योग, व्यापार, तसेच शहरातील दैनंदिन प्रवाशांसाठीही हा रिंग रोड अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. वाहतुकीसाठी लागणारा वेळ आणि इंधन खर्च दोन्हीही मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे, यामुळे आर्थिकदृष्ट्या आणि पर्यावरणाच्या दृष्टीनेही हा प्रकल्प फायदेशीर ठरेल.

शेतकऱ्यांचा प्रतिसाद आणि भविष्यातील आव्हाने

या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांचा प्रतिसाद महत्त्वाचा ठरणार आहे. भूसंपादन प्रक्रिया जलद पार पडावी म्हणून शेतकऱ्यांना अधिकाधिक मोबदला देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मात्र, काही भागांमध्ये अजूनही नागरिकांकडून विरोध दर्शवला जात आहे. सरकारने पुनर्वसन, योग्य मोबदला आणि पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ठोस पावले उचलल्यास, स्थानिकांचा सहभाग वाढू शकतो आणि हा महत्त्वाचा प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यास मदत होईल.

पुणे रिंग रोड हा पुणे शहराच्या वाहतूक व्यवस्थेसाठी एक मोठा गेम-चेंजर ठरणार आहे. या प्रकल्पामुळे शहराच्या बाहेरून जाणाऱ्या वाहतुकीला एक सुरक्षित आणि वेगवान मार्ग मिळेल, परिणामी शहरातील वाहतूक कोंडी कमी होईल. भूसंपादन प्रक्रियेला आता वेग मिळत असून, खासगी वाटाघाटींमार्फत शेतकऱ्यांना 25 टक्के अतिरिक्त मोबदला मिळणार असल्याने त्यांच्यासाठी हा एक फायदेशीर पर्याय सुद्धा ठरू शकतो. प्रशासनाने या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी सर्व भागधारकांना विश्वासात घेऊन निर्णय घेतल्यास, पुणेकरांसाठी हा रिंग रोड लवकरच वास्तवात उतरेल आणि वाहतूक व्यवस्थेत क्रांती घडवणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe