माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा खरंच बेपत्ता झाला होता का ? ऋषीराज सावंत यांच्या अपहरणामागील ए टू झेड स्टोरी

Tanaji Sawant News : शिंदे सरकारमध्ये मंत्री असणारे तानाजी सावंत यांचे सुपुत्र ऋषीराज सावंत आणि त्यांच्या अपहरण प्रकरणाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. खरेतर, राज्याचे माजी मंत्री तानाजी सावंत यांचे सुपुत्र ऋषीराज सावंत यांच्या बेपत्ता होण्याच्या वृत्ताने एकच खळबळ उडाली होती. प्रारंभी, ऋषीराज यांचे पुण्यातून अपहरण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुद्धा केला, मात्र कोणत्याही प्रकारचा संपर्क न झाल्याने त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

या तक्रारीनंतर पुणे पोलिस तातडीने तपासाला लागले आणि काही तासांतच एक महत्त्वाची माहिती समोर आली. ऋषीराज हे अपहरणाच्या प्रकरणात नव्हते, तर ते त्यांच्या मित्रांसोबत बँकॉकला प्रवास करत असल्याचे स्पष्ट झाले. यामुळे सावंत कुटुंबीयांनी सुटकेचा निश्वास सोडला, परंतु या प्रकारामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. ऋषीराज सावंत हे एका खासगी चार्टर फ्लाईटने बँकॉकला रवाना झाले होते.

त्यांच्या प्रवासाची कोणतीही पूर्वसूचना कुटुंबाला देण्यात आलेली नव्हती, त्यामुळेच त्यांच्या बेपत्ता होण्याची भीती निर्माण झाली होती. याबाबत अधिक माहिती घेण्यात आली असता असे समोर आले की, ऋषीराज हे त्यांचे मित्र प्रवीण उपाध्याय आणि संदीप वासेकर यांच्यासह बँकॉकला गेले होते. त्यांना पुणे विमानतळावर एका कारमधून सोडण्यात आले होते.

या कारचालकानेच ऋषीराज यांच्या प्रवासाची माहिती त्यांच्या वडिलांना दिली. ही माहिती मिळताच सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पुणे पोलिसांना संपूर्ण प्रकार कळवला. तक्रार मिळाल्यानंतर पुणे पोलिसांनी त्वरीत तपास सुरू केला आणि ऋषीराज हे एका खासगी चार्टर फ्लाईटने बँकॉकसाठी रवाना झाल्याची पुष्टी केली.

त्यानंतर हे विमान चेन्नई विमानतळावर उतरवण्यात आले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर माजी मंत्री तानाजी सावंत यांनी पत्रकार परिषद घेतली आणि या संपूर्ण घटनेबाबत स्पष्टीकरण दिले. त्यांनी सांगितले की, त्यांचा मुलगा कोणत्याही अनोळखी लोकांसोबत नव्हता, तो त्याच्या ओळखीच्या मित्रांसोबत होता.

मात्र, तो घरातून बाहेर पडताना कोणालाही काहीही न सांगता गेला होता. हे पाहता त्याच्या सुरक्षिततेची चिंता वाटल्याने पोलिसांकडे मदत मागण्यात आली. तानाजी सावंत यांनी सांगितले की, ऋषीराज हा दररोज कुटुंबीयांसोबत १५ ते २० वेळा फोनवर बोलत असतो.

तसेच तो बाहेर जाताना आपल्या मोठ्या भावाला किंवा घरातील कोणालातरी त्याच्या नियोजनाविषयी सांगतो. मात्र, या वेळी तसे झाले नव्हते. त्यामुळे गोंधळ उडाला आणि अपहरण झाल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला. त्यांच्या संस्थेतील एका अधिकाऱ्याने तक्रार दाखल केली आणि त्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला.

या घटनेनंतर ऋषीराज यांचा प्रवास का लपवण्यात आला, त्यांनी कुटुंबाला याची माहिती का दिली नाही, आणि त्यांनी चार्टर फ्लाईटनेच प्रवास करण्याचा निर्णय का घेतला, यासारखे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पोलिस तपासात काही वित्तीय किंवा इतर कोणत्याही प्रकरणाचा संबंध आहे का, याचाही शोध घेतला जात आहे. सावंत कुटुंबाने मात्र या संपूर्ण प्रकाराबाबत आता कोणतीही अतिरिक्त प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe