काटवन खंडोबा परिसरात महिला वकिलास जीवे मारण्याची धमकी

Sushant Kulkarni
Published:

१२ फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : घरात घुसण्याचा प्रयत्न केल्याबाबत विचारणा केल्याचा राग येऊन एकाने महिला वकील व तिच्या मुलास तसेच त्यांच्या भांडणात जे मध्ये येईल, त्यांना मारून टाकण्याची धमकी दिली. ही घटना १० फेब्रुवारी रोजी काटवन खंडोबा रोड, सप्तपदी मंगल कार्यालयाच्या पाठीमागे येथे घडली.

याबाबतची माहिती अशी की, काही दिवसांपूर्वी किरण बबन कोळपे (रा. विळद पाण्याच्या टाकीजवळ, विळद, ता. नगर) याने अॅड. नाजमीन बागवान यांच्या घरात अनाधिकाराने घुसून त्यांचा हात पिरगाळून त्यांना दुखापत केली.तसेच त्यांच्या घरातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम, कोर्ट केसचे पेपर्स चोरून नेले होते.

या प्रकरणी अॅड. नाजमीन बागवान यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात कोळपे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला होता.त्यानंतर १० फेब्रुवारी रोजी किरण कोळपे हा बागवान यांच्या घराच्या कंपनीवरुन उडी मारत असताना बागवान यांच्या मुलाने पाहिले म्हणून किरण कोळपे तिथून निघून गेला.

ही बाब बागवान यांच्या मुलाने त्यांना सांगितली. बागवान यांनी किरण कोळपे यास फोन करून कोळपे यास तू आमच्या घराच्या परिसरात का फिरत आहेस, माझ्या घरावर पाळत का ठेवतोस, अशी विचारणा केली असता कोळपे याने अॅड. बागवान यांना शिवीगाळ करुन तुला व तुझ्या मुलाला तसेच जो आपल्यामध्ये येईल अशा सर्वांना मारून टाकीन.

बागवान यांची चुलत बहीण मायरा बागवान हिला देखील संपवून टाकीन अशी धमकी दिली. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी अॅड. नाजमीन बागवान यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन किरण कोळपे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe