१३ फेब्रुवारी २०२५ राहुरी शहर : तीन महिन्यांपूर्वी अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यात राहुरी पोलिसांना यश आले असून, तिची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.तसेच, या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की राहुरी पोलीस स्टेशन येथे गु. र.नं. १२००/२०२४ इठर १३७ (२) अन्वये १७ नोव्हेंबर २०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अपहृत मुलीबाबत कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नसतानाही गुप्त बातमीदार, तांत्रिक तपास आणि पोलिसांच्या अथक प्रयत्नांमुळे अखेर मुलीचा ठावठिकाणा सापडला.तिला शोधून सुखरूप सुटका करण्यात आली असून, तिचा जबाब नोंदवून ती कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आली आहे.

या गुन्ह्यात आरोपी आदिनाथ गीताराम निशाने (रा. खूडसरगाव, ता. राहुरी) याला अटक करण्यात आली आहे.त्याच्याकडून अधिक चौकशी सुरू असून, पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील आणि पोकॉ. गणेश लिपणे पुढील तपास करत आहेत.राहुरी पोलीस स्टेशन हद्दीतील ५५ मुली आणि ६ अल्पवयीन मुले हरवले होते.
‘ऑपरेशन मुस्कान’ अंतर्गत सर्व मुलांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.तसेच,आरोपींना अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे (श्रीरामपूर उपविभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील, हेड कॉन्स्टेबल राहुल यादव, कॉन्स्टेबल अशोक शिंदे, गणेश लिपणे
आदिनाथ पाखरे, वृषाली कुसळकर (राहुरी पोलीस स्टेशन) आणि पोलीस नाईक संतोष दरेकर (अपर पोलीस अधीक्षक कार्यालय, श्रीरामपूर मोबाईल सेल) यांनी केली आहे.राहुरी पोलिसांचे हे उत्कृष्ट कार्य नागरिकांतून कौतुकास्पद ठरत आहे.