१३ फेब्रुवारी २०२५ शिर्डी : देशाच्या नकाशावर ठळकपणे स्थान मिळवलेल्या साईबाबांच्या शिर्डी शहरात गेल्या काही वर्षांत गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून, शहर संवेदनशील बनले आहे. शिर्डीत सध्या पोलिसांच्या रेकॉर्डवर लहानमोठे ११४ गुन्हेगार नोंद आहेत,त्यापैकी १२ सराईत गुन्हेगार आहेत.त्यातील ११ जणांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली असली,तरी त्यापैकी दोघांचा तडीपारीचा कालावधी संपला आहे.
अनेकजण अद्याप पोलिसांच्या रेकॉर्डवर आलेले नाहीत.हद्दपार गुन्हेगारांविरोधातील कारवाईला वेग देण्यात आला असून,उर्वरित नऊ तडीपार गुन्हेगारांपैकी पाच जण बेकायदेशीरपणे शिर्डीत वास्तव्यास असल्याचे आढळून आले.पोलिसांनी त्यांना गेल्या आठवडाभरात अटक केली आहे.
तडीपार गुन्हेगारांनी ठरलेल्या पोलिस ठाण्यात नियमित हजेरी लावणे बंधनकारक असते.मात्र,असे असतानाही काही गुन्हेगार आपल्या घरीच बिनधास्त राहत असल्याचा प्रकार उघड झाला आहे.त्यामुळे पोलिस यंत्रणेमध्ये कुचराई झाली का ? असा प्रश्न स्थानिक नागरिक विचारत आहेत.
विशेष म्हणजे, नुकत्याच घडलेल्या दुहेरी हत्याकांडातील एका आरोपीवर तडीपारीची कारवाई करण्यात आली होती, हे अधिक धक्कादायक आहे.पोलिस कायदा-सुव्यवस्था सुरळीत करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत असतानाही मंगळवारी पुन्हा एका व्यक्तीवर चाकू हल्ला झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर शहरात आणखी मोठ्या कारवायांची अपेक्षा केली जात आहे.शिर्डीत अजून १३ जणांच्या तडीपारीच्या फाईली पोलिस आणि महसूल विभागाकडे प्रलंबित आहेत.सध्या दोन जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई सुरू आहे, तर आणखी एका गुन्हेगारावर मोक्काची कारवाई प्रस्तावित आहे.
याशिवाय,इतर जिल्ह्यांतून तडीपार केलेले चार गुन्हेगार शिर्डीत वास्तव्यास असल्याचे समोर आले असून, त्यातील तिघांची तडीपारीची मुदत संपली आहे. तथापि, बेकायदेशीररित्या वास्तव्य करणाऱ्या गुन्हेगारांची संख्याही मोठी असण्याची शक्यता आहे.
शिर्डीतील स्थानिक नागरिक आणि साईभक्तांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी बाहेरून येणाऱ्या कोणत्याही तडीपार गुन्हेगाराला शिर्डीत थारा देऊ नये, अशी मागणी शिर्डीकरांकडून जोर धरू लागली आहे. प्रशासन आणि पोलिस यंत्रणेने यावर कठोर पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.