विद्यार्थिनीवर अत्याचार करून मुख्याध्यापकाने करवला गर्भपात ; नांदेडमध्ये संताप

Sushant Kulkarni
Published:

१३ फेब्रुवारी २०२५ तामसा (जि. नांदेड) : हदगाव तालुक्यातील तामसा परिसरातील रहिवासी असलेल्या व तामशात शिकण्यासाठी येणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा गर्भपात केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे.याप्रकरणी अखेर नराधम मुख्याध्यापकाविरुद्ध तामसा पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी अजून फरार आहे.तामसा परिसरातील एका गरीब कुटुंबातील १७ वर्षीय मुलीला पोलीस खात्यात नोकरी करायची इच्छा होती. त्या अनुषंगाने तिचे प्रयत्न सुरू असल्याचे कळल्यावर नराधम मुख्याध्यापक राजूसिंह चौहान याने तिच्या वडिलांना विश्वासात घेऊन तुमच्या मुलीला मी नांदेडला पोलीस भरती केंद्रात शिक्षणाची सोय करतो,असे सांगून एके दिवशी तिला कारमधून सोबत नेले.

एवढेच नव्हे तर आणखी काही मुलीही सोबत आहेत,असे राजूने सांगितले.त्यामुळे पीडिता ही राजूसिंह चौहान याच्या कारमधून काही दिवसांपूर्वी नांदेडला निघाली. वाटेत पाटनूर घाटात त्याने पिण्याच्या पाण्यामधून गुंगीचे औषध देत तिच्यावर तिथे अत्याचार केला.ही घटना २८ ऑक्टोबर २०२४ रोजी घडली.नंतर ही पीडिता गर्भवती राहिली.

नंतर राजूने तिला गर्भपातासाठी नांदेडच्या एका रुग्णालयात नेले. या प्रकरणाचा सर्वत्र बोभाटा झाल्याने एकच खळबळ उडाली.काही वृत्तपत्रांनी या प्रकरणातील ‘नराधम शिक्षक कोण’ ? म्हणून वृत्त प्रकाशित केल्यावर व पीडितेने ही बाब पालकांना सांगितल्यानंतर तामसा पोलीस ठाण्यात १२ फेब्रुवारी रोजी तिचा इन कॅमेरा जबाब नोंदवून तामसा पोलीस ठाण्यात पॉक्सो, अॅट्रॉसिटी कलम, गर्भपात करणे आदी कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.राजूने केलेल्या अमानुष कृत्याच्या निषेधार्थ तामसात कडकडीत बंद ठेवण्यात आला होता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe