RBI News : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) ₹50 रुपयांच्या नोटेसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. लवकरच नवीन ₹50 ची नोट जारी करण्यात येणार असून, या नोटेवर आरबीआयचे नवनियुक्त गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची स्वाक्षरी असणार आहे. यामुळे आधीच्या 50 रुपयांच्या नोटांच्या वैधतेबाबत अनेकांना शंका येऊ शकते, मात्र RBI ने स्पष्ट केलं आहे की, आधीच्या नोटाही पूर्वीप्रमाणे वैध राहतील.
नवीन ₹50 रुपयांची नोट कशी असेल?
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या माहितीनुसार, महात्मा गांधी (नवीन) सीरीजमधील ₹50 रुपयांची नोट लवकरच चलनात येणार आहे. या नोटेचा आकार 66 मिमी X 135 मिमी असून, याचा रंग निळा असणार आहे नोटेच्या मागील बाजूस हंपी आणि रथाचे चित्र असणार आहे, जे भारतीय सांस्कृतिक वारसा दर्शवते. ही नोट महात्मा गांधी सीरीजच्या सध्याच्या 50 रुपयांच्या नोटांसारखीच असेल, त्यामुळे ग्राहकांना नव्या नोटेच्या रचनेत फारसा बदल जाणवणार नाही.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2025/02/Marathi-News-14.jpg)
नवीन नोटेवर यांची स्वाक्षरी
RBI चे नवनियुक्त गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची स्वाक्षरी असलेली ही पहिली नोट असेल. शक्तीकांत दास यांच्या निवृत्तीनंतर डिसेंबर 2024 मध्ये संजय मल्होत्रा यांनी RBI चा पदभार स्वीकारला. त्यांच्या स्वाक्षरीसह नवीन नोट बाजारात येणार असल्याने त्यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.
संजय मल्होत्रा कोण ?
संजय मल्होत्रा हे 1990 बॅचचे राजस्थान कॅडरचे वरिष्ठ अधिकारी आहेत. त्यांनी पूर्वी डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेस (DFS) चे सचिव म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. नोव्हेंबर 2020 मध्ये REC चे चेअरमन आणि एमडी म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. याशिवाय, त्यांनी उर्जा मंत्रालयात अतिरिक्त सचिव म्हणूनही महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे.
सध्याच्या ₹50 च्या नोटांचे काय ?
आरबीआयने स्पष्ट केलं आहे की, पूर्वीच्या 50 रुपयांच्या नोटा वैध राहतील. त्यामुळे ग्राहकांना काळजी करण्याची गरज नाही. नवीन नोट बाजारात येईल, पण सध्याच्या नोटा रद्द होणार नाहीत. नवीन नोट जारी करण्यामागे अर्थव्यवस्थेत अधिक स्थैर्य आणि चलन सुलभ करणे हे उद्दिष्ट आहे. यामुळे बाजारात चलनाची अधिक सुविधा होईल आणि रोख व्यवहार आणखी सुलभ होतील. यासोबतच, RBI ची नव्या तंत्रज्ञानासह नोटांची सुरक्षितता वाढवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ATM मधून ग्राहकांच्या हातात
भारतीय रिझर्व्ह बँकेने घेतलेल्या या निर्णयामुळे ग्राहकांना नवीन नोटेचा अनुभव मिळेल. ही नोट महात्मा गांधी सीरीजच्या नोटांप्रमाणेच असेल, मात्र संजय मल्होत्रा यांच्या स्वाक्षरीमुळे ती वेगळी ठरणार आहे. आधीच्या नोटा देखील व्यवहारात चालू राहणार असल्याने सर्वसामान्य ग्राहकांना कोणतीही अडचण येणार नाही. लवकरच RBI नव्या ₹50 नोटा चलनात आणणार आहे, त्यामुळे बँक आणि ATM मधून ही नोट ग्राहकांच्या हातात येईल.