अदानी यांची ‘ही’ कंपनी श्रीलंकामधील एका मोठ्या प्रोजेक्ट मधून बाहेर ! कारण काय ?

कंपनीने श्रीलंकेच्या सरकारी एजन्सीला पाठवलेल्या पत्रानुसार, कंपनी श्रीलंकेतील दोन प्रस्तावित पवन ऊर्जा प्रकल्पांमधून माघार घेत आहे. श्रीलंकेच्या सरकारने गेल्या महिन्यात सांगितले होते की, त्यांनी $1 अब्ज डॉलरच्या प्रकल्पातून वीज खर्च कमी करण्यासाठी अदानी समूहाशी चर्चा सुरू केली आहे.

Tejas B Shelar
Published:

Adani Group Stock : शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी विशेषता अदानी समूहाच्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एक महत्त्वाची बातमी हात येत आहे. ती म्हणजे अदानी समूहाच्या अदानी ग्रीन एनर्जी कंपनीबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या कंपनीने श्रीलंकेतील त्याचे दोन पवन ऊर्जा प्रकल्प सोडले आहेत.

कंपनीने श्रीलंकेच्या सरकारी एजन्सीला पाठवलेल्या पत्रानुसार, कंपनी श्रीलंकेतील दोन प्रस्तावित पवन ऊर्जा प्रकल्पांमधून माघार घेत आहे. श्रीलंकेच्या सरकारने गेल्या महिन्यात सांगितले होते की, त्यांनी $1 अब्ज डॉलरच्या प्रकल्पातून वीज खर्च कमी करण्यासाठी अदानी समूहाशी चर्चा सुरू केली आहे.

दरम्यान, आता श्रीलंकेच्या सरकारने असा स्टॅन्ड घेतल्यानंतर अदानी समूहाच्या अदानी ग्रीन एनर्जी कंपनीने त्यांच्या दोन पवन ऊर्जा प्रकल्पातून माघार घेतली असल्याचे वृत्त हाती आले आहे.

न्यूज एजन्सी रॉयटर्सच्या वृत्तानुसार, कंपनीने श्रीलंकेच्या गुंतवणूक मंडळाच्या अध्यक्षांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात असे नमुद केले आहे की, ‘आम्हाला असे कळले आहे की प्रकल्प प्रस्तावावर पुन्हा चर्चा करण्यासाठी आणखी एक मंत्रिमंडळ नियुक्त वाटाघाटी समिती आणि प्रकल्प समिती स्थापन केली जाईल.

आमच्या कंपनीच्या बोर्डामध्ये या पैलूवर चर्चा झाली. यानंतर असे ठरले की कंपनी श्रीलंकेच्या सार्वभौम अधिकारांचा आणि त्यांच्या निवडीचा पूर्ण आदर करते परंतु कंपनी आदरपूर्वक या पवन ऊर्जा प्रकल्पातून माघार घेत आहे.’ मात्र, आतापर्यंत श्रीलंकेच्या गुंतवणूक मंडळाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही किंवा अदानी समूहाने सुद्धा या प्रकरणी कोणतेही वक्तव्य केलेले नाही.

खरेतर, गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये गौतम अदानी आणि इतर अधिकाऱ्यांवर अमेरिकन अधिकाऱ्यांनी भारतीय वीज पुरवठा करार सुरक्षित करण्यासाठी लाच दिली असल्याचा आरोप केला होता. यानंतर श्रीलंकेने अदानी समूहाच्या स्थानिक प्रकल्पांचा आढावा घेण्यास सुरुवात केली.

जानेवारीमध्ये श्रीलंका सरकारच्या प्रवक्त्या नलिंदा जयतिसा यांनी सांगितले होते की, या प्रकल्पाची किंमत प्रति युनिट US $ 0.06 ने कमी करण्यासाठी सरकार अदानी समूहाच्या कंपनीशी नवीन चर्चा करेल. खरेतर, श्रीलंकेच्या मागील सरकारने 484 मेगावॅट क्षमतेच्या पवन प्रकल्पासाठी 8.2 सेंटच्या किमतीत अदानी ग्रीन एनर्जीसोबत 20 वर्षांचा वीज खरेदी करार (PPA) करण्याचा निर्णय घेतला होता.

मात्र, स्थानिक बोलीदारांनी युनिटच्या किमती कमी केल्यामुळे हा निर्णय वादग्रस्त ठरला. म्हणून श्रीलंकेतील निवडणूक प्रचारादरम्यान हा मोठा मुद्दा बनला होता. जयतिसा यांचा पक्ष नॅशनल पीपल्स पॉवरने निवडणूक प्रचारादरम्यान अदानी ग्रीन एनर्जी प्रकल्प रद्द करण्याचे आश्वासन दिले होते.

नवीन सरकारने डिसेंबरमध्ये मागील सरकारने मान्य केलेल्या खरेदी किमतींवर स्वाक्षरी करण्यास नकार दिला होता. तथापि, श्रीलंका सरकारने देशाच्या उत्तर-पूर्व भागात स्थित अदानी ग्रीन एनर्जी प्रकल्प मन्नार आणि पूनारिन प्रकल्प रद्द केले जातील या वृत्ताचा इन्कार केला.

मात्र सरकारने नेमलेली समिती संपूर्ण प्रकल्पाचा आढावा घेईल, असे सुद्धा सांगितले आहे. यामुळे आता अदानी समूहाच्या या कंपनीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांवर नेमका काय परिणाम होणार हे पाहणे विशेष उत्सुकतेचे ठरणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe