EPFO Money Alert | कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) ही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेद्वारे (ईपीएफओ) व्यवस्थापित एक सेवानिवृत्ती बचत योजना आहे. या योजनेद्वारे कर्मचारी आपले भविष्य सुरक्षित करू शकतात. योग्य नियोजन आणि संयम ठेवल्यास, या योजनेतून निवृत्तीपर्यंत 1 कोटी रुपयांचा भरीव निधी उभारता येऊ शकतो.
ज्या कर्मचाऱ्याचा महिन्याचा पगार फक्त 18 हजार रुपये आहे त्याला सुद्धा या योजनेतून एक कोटी तीस लाख रुपयांचा निवृत्ती निधी मिळू शकतो. दरम्यान आज आपण 18 हजार रुपये मासिक पगार असणाऱ्या कर्मचाऱ्याला कशा पद्धतीने एक कोटी तीस लाखांचा निधी मिळणार याचे एक गणित थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
![EPFO Money Alert](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2025/02/EPFO-Money-Alert.jpeg)
कसा होईल 1 कोटींचा निधी ?
जर एखाद्या कर्मचाऱ्याने वयाच्या 25 व्या वर्षी ईपीएफमध्ये योगदान द्यायला सुरुवात केली आणि त्याचा मूळ वेतन व महागाई भत्ता (डीए) मिळून 18,000 रुपये असेल, तर 60 व्या वर्षी निवृत्तीच्या वेळी 1.30 कोटी रुपयांचा निधी जमा होऊ शकतो. मात्र, हे शक्य होण्यासाठी संपूर्ण सेवाकाळात कोणतीही माघार न घेता योगदान सुरू ठेवणे आवश्यक आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे त्या संबंधित कर्मचाऱ्यांनी आपल्या सेवा काळात ईपीएफ मधून पैसे काढायला नकोत. तसेच त्याचे योगदान कोणत्याच कारणाने थांबायला नको. जर असे घडले तर संबंधित कर्मचारी हा सेवानिवृत्तीनंतर एक कोटी तीस लाख रुपये मिळू शकतो.
ईपीएफमध्ये योगदान आणि व्याजदर
सध्या ईपीएफ खात्यावर वार्षिक 8.25 टक्के व्याज दिले जाते. कर्मचाऱ्याला आपल्या मूळ वेतनाच्या 12 टक्के रक्कम ईपीएफमध्ये जमा करावी लागते, तर नियोक्ताही त्याच्या वेतनाच्या 3.67 टक्के योगदान देतो.
तसेच, कंपनीच्या एकूण योगदानापैकी 8.33 टक्के रक्कम कर्मचारी पेन्शन योजनेत (ईपीएस) जाते. आता आपण 18 हजार पगार असणाऱ्या कर्मचाऱ्याला कसा एक कोटी रुपयांचा निधी मिळणार याचे गणित समजून घेऊयात.
कसे आहे कॅल्क्युलेशन?
कर्मचाऱ्याचे वय : 25 वर्षे
सेवानिवृत्तीचे वय : 60 वर्षे
बेसिक वेतन + डीए : 18,000 रुपये
कर्मचारी योगदान : 12%
कंपनी योगदान : 3.67%
वार्षिक वेतन वाढ : 5%
ईपीएफवरील व्याज : वार्षिक 8.25%
एकूण योगदान : 32,43,777 रुपये
निवृत्तीचा निधी : 1,30,35,058 रुपये (अंदाजे 1.30 कोटी रुपये)
निवृत्ती सुरक्षित करण्यासाठी संयम महत्त्वाचा
ईपीएफ हे दीर्घकालीन बचतीचे साधन आहे. या योजनेतून वेळोवेळी पैसे काढल्यास अंतिम निधीवर मोठा परिणाम होतो. त्यामुळे, निवृत्तीपर्यंत निधी वाढवण्यासाठी माघार न घेता नियमित योगदान देणे फायदेशीर ठरते.
सरकारी कर्मचाऱ्यांपासून खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांसाठी ईपीएफ हे आर्थिक स्थैर्य मिळविण्यासाठी एक महत्वपूर्ण साधन आहे. म्हणूनच, या योजनेचा योग्य प्रकारे लाभ घेतल्यास प्रत्येक कर्मचारी आपले भविष्य आर्थिक दृष्ट्या सुरक्षित करू शकतो.