१५ फेब्रुवारी २०२५ नेवासा : मुळा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगामाचे पाणी तातडीने सोडण्याची मागणी आमदार विठ्ठलराव लंघे यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली होती. त्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत सोमवार, १७ फेब्रुवारी पासून आवर्तन सुरू करण्याच्या सूचना मंत्री विखे यांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत.
याबाबत आमदार लंघे यांनी पत्रकात सांगितले, की यापूर्वी मुळा उजव्या कालव्याचे रब्बी हंगामाचे नियोजित आवर्तन पूर्ण झाले होते, तर उन्हाळी आवर्तन १ मार्च पासून सुरू करण्याचे नियोजन होते. मात्र, या भागातील भूगर्भातील पाणीपातळी मोठ्या प्रमाणात खालावल्याने नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांनी तातडीने पाटपाणी सोडण्याची मागणी केली होती.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2025/02/18-1.jpg)
या मागणीची दखल घेत आमदार लंघे-पाटील यांनी पालकमंत्र्यांकडे आवर्तन सुरू करण्यासाठी प्रयत्न केले.त्यानुसार, १७ फेब्रुवारी पासून मुळा उजव्या कालव्याचे आवर्तन सोडले जाणार आहे.या निर्णयामुळे नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात असून,आमदार विठ्ठलराव लंघे व मंत्री विखे यांच्या पुढाकाराचे शेतकऱ्यांकडून स्वागत करण्यात येत आहे.