अहिल्यानगर – शहरातील अनधिकृत नळ कनेक्शन शोधण्याची मोहीम महानगरपालिकेने हाती घेतली आहे. शहराच्या विविध भागातील अनधिकृत नळ कनेक्शन शोधून संबंधित नळ धारकांवर दंडात्मक व फौजदारी कारवाई केली जाणार आहे.
गोविंदपुरा परिसरात अनधिकृत नळ कनेक्शन घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या मालमत्ताधारकावर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी त्यांचे नळ कनेक्शन अनधिकृत असल्यास ते तत्काळ अधिकृत करून घ्यावे, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिला आहे.

गोविंदपुरा परिसरात नवीन बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी घरासमोर महानगरपालिकेची परवानगी न घेता रस्ता फोडून अनधिकृत नळ कनेक्शन घेण्याचा प्रयत्न एका मालमत्ताधारकाने केला. त्यासाठी १५ फूट लांब रस्ता खोदण्यात आला.
संबंधित प्रभाग अधिकाऱ्यांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी कठोर कारवाई करत पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. सदरचा प्रकार गंभीर असून महानगरपालिकेची आर्थिक फसवणूक व नुकसान करणारा आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत संपूर्ण शहरात अशा प्रकारे अनधिकृत नळ कनेक्शन घेणाऱ्यांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे.
शहरात ज्या मालमत्ताधारकांकडे अनधिकृत नळ कनेक्शन आहेत, त्यांनी त्यांचे नळ कनेक्शन अधिकृत करून घ्यावे. अनधिकृत नळ कनेक्शन शोधून त्यांच्यावर दंडात्मक व फौजदारी कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे कारवाई टाळण्यासाठी अनधिकृत नळ कनेक्शन तत्काळ अधिकृत करून घ्यावे, त्यासाठी संबंधित प्रभाग समिती कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे.