खरिपातील पिके जोमात मात्र शेतकरी कोमात पाणी टंचाईच्या झळा झाल्या तीव्र; नगर तालुक्यातील परिस्थिती

Updated on -

Ahilyanagar News : नगर तालुक्यात रब्बी हंगामातील सुमारे ७० हजार हेक्टर क्षेत्रावर पिकांची पेरणी, लागवड झाली होती. सद्यस्थितीत तालुक्यातील काही भागात गव्हाची सोंगणी सुरू असून काही ठिकाणी गहू काढणीला आलेला आहे. गव्हाचे पीक जोमदार आले असले तरी गावरान कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा जीव मात्र टांगणीला लागला आहे.

गावरान कांद्यासाठी अनेक भागात पाणी टंचाई जाणवणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.नगर तालुका दुष्काळी पट्टा म्हणून ओळखला जातो.परंतु तालुक्यात झालेल्या जलसंधारण व मोठ्या प्रमाणातील बंधाऱ्यांमुळे गेल्या दशकांपासून रब्बी हंगामातील पिके जोमदार येत आहेत.

रब्बी हंगामाचे उत्पादन देखील वाढले आहे. चालू वर्षी तालुक्यात कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला.जेऊर पट्ट्यातील बहुतांशी तलाव, बंधारे भरलेच नाही.त्यामुळे तालुक्यात अनेक ठिकाणी पाणी टंचाई जाणवणार आहे.इमामपूर सारख्या डोंगर उतारावर वसलेल्या गावांनी तर गव्हाच्या पिकालाही एका पाण्याची कमतरता जाणवली. त्यामुळे गव्हाचे उत्पन्न देखील घटले आहे.

ज्वारीचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तालुक्यात कांदा उत्पादन मोठ्या प्रमाणावर होऊ लागल्याने नगर तालुक्याची कांद्याचे कोठार म्हणून ओळख निर्माण होत आहे. लाल कांदा, रांगडा कांदा, गावरान कांदा उत्पादनात तालुका अग्रेसर आहे. कांद्याच्या वाढत्या उत्पादनामुळे राज्य तसेच राज्यातील अनेक व्यापाऱ्यांनी तालुक्यात स्थायिक होऊन कांद्याच्या खरेदी विक्रीचा व्यापार सुरू केलेला आहे.

संपूर्ण जिल्ह्यात शेताच्या बांधावर कांद्याची खरेदी नगर तालुक्यातूनच होत आहे. तालुका हा कांदा खरेदी विक्रीचे केंद्रबिंदू बनलेला आहे.पावसाळ्यात पिंपळगाव माळवी तलाव, जेऊर, इमामपूर, डोंगरगण पट्ट्यातील बहुतांशी तलाव कोरडेच राहिले.नद्या नाले वाहते झालेच नाही.त्यामुळे तालुक्यात कांदा उत्पादनात अग्रेसर असणाऱ्या जेऊर पट्ट्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांसमोर पाणीटंचाईचे संकट उभे ठाकले आहे.

तालुक्यात सुमारे १६ हजार हेक्टर क्षेत्रावर कांद्याची लागवड करण्यात आलेली आहे.परंतु डोंगर उतारावरील गावांनी पाणी टंचाईच्या झळा जाणवु लागल्या आहेत.पाणी टंचाईची झळ जाणवण्यास लागली असून मका, कडवळ चारा पिके जोमात आहेत. परंतु गावरान कांद्यासाठी पाण्याचा तुटवडा जाणवणार आहे.त्यामुळे शेतकरी चिंतेत दिसून येत आहे.

तालुक्यात गव्हाचे पीक जोमदार आले असून कांद्याच्या उत्पादनात मात्र घट होणार असल्याचे चित्र दिसत आहे. चास, अकोळनेर, रुईछत्तीसी, चिचोंडी पाटील पट्ट्यातील बहुतांशी तलाव पूर्ण क्षमतेने भरले होते. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामाबाबत थोडा दिलासा मिळाला आहे. भौगोलिक संरचनेनुसार तालुक्यातून मोठ्या प्रमाणात गर्भगिरीच्या डोंगर रांगा विखुरलेल्या आहेत.

त्यामुळे अनेक गावे डोंगर रांगांच्या तीव्र उतारावर कुशीत वसलेली आहेत. त्यामुळे अशा गावांनी उन्हाळ्यात भूजल पातळी झपाट्याने खालावत असून तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. चालू वर्षी देखील अनेक गावांनी पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करावी लागणार असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. रब्बी हंगामातील चारा पिके तसेच गव्हाचे उत्पादन चांगल्या प्रमाणात होणार असले तरी गावरान कांद्याच्या उत्पादनावर पाणीटंचाईचे संकट जाणवत आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण दिसून येते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe