१७ फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : ११ कोटी ६३ लाख ७१ हजार रुपयांची पाणीपट्टी थकविल्याने जलसंपदा विभागाने महापालिकेला नोटीस बजावली असून २० फेब्रुवारी पर्यंत पैसे भरा अन्यथा पूर्वसूचना न देता शहराचा पाणीपुरवठा खंडित करण्याचा इशारा दिला आहे.
अहिल्यानगर शहराला मुळा धरणातून पिण्यासाठी पाणीपुरवठा होतो. या पाणीपुरवठ्यापोटी जलसंपदा विभाग महापालिकेला पाणीपट्टी आकारते. मनपाने २०२४-२५ या आर्थिक वर्षात पाणीपट्टीचे २१ लाख २० हजार ६५६ रुपये भरलेले आहेत.उर्वरित रक्कम बाकी असल्याने मुळा पाटबंधारे विभागाच्या उपकार्यकारी अभियंता धनश्री शिंदे यांनी १४ फेब्रुवारी रोजी मनपाला थकबाकीबाबत नोटीस बजावली आहे.

करवसुली हाच महापालिकेच्या उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत आहे. मात्र, थकबाकीदारांना शास्ती माफी देऊनही वेळेत व अपेक्षित करवसुली होत नाही. त्यामुळे मनपाच्या तिजोरीत नेहमीच खडखडाट असतो.मनपाला वीज बिले, कर्मचाऱ्यांची देणी, पुरवठादार व ठेकेदारांची देणी यासह शहरात सुरू असलेल्या प्रकल्पांमध्ये स्वहिस्सा अशी सुमारे ४४६.८० कोटी रुपयांची देणी आहे.अशा स्थितीत आता मनपाला जलसंपदा विभागाचे तातडीने पैसे भरावे लागणार आहेत.