नगर तालुक्यातील ‘या’ गावात साजरा होणार ऐतिहासिक शिवजयंती उत्सव ! इंदुरीकर यांच्या किर्तनासह विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

Updated on -

Ahilyanagar News : नगर तालुक्यातील जेऊर येथे पंचक्रोशीतील सकल शिवप्रेमींकडून शिवजयंती उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे. जेऊर पंचक्रोशीतील सर्व तरुणांनी एकत्र येत शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवजयंती निमित्त विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

मंगळवार दि.१८ रोजी ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे जाहीर कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच बुधवार दि.१९ रोजी सकाळी नऊ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात येणार आहे. त्यानंतर रक्तदान शिबिर संपन्न होणार आहे. सायंकाळी चार वाजता पारंपारिक वाद्यांच्या गजरात भव्य अशी मिरवणूक काढण्यात येणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीसाठी जेऊर पंचक्रोशीतील सर्व लहान मोठ्या गावच्या तरुणांनी एकत्र येत शिवजयंती उत्सव साजरा करण्याचा ऐतिहासिक असा निर्णय घेतला आहे. शिवजयंती निमित्त दिवसभर पोवाडे तसेच शालेय विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धाही आयोजित करण्यात आलेल्या आहेत.छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेले कार्य हे संपूर्ण जगाला प्रेरणादायी ठरत आहे.

अशा या महामानवाच्या जयंतीसाठी सर्व तरुणांनी एकत्र येत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. छत्रपती शिवरायांच्या कार्याची माहिती बालपणीच चिमुकल्यांना समजावी या दृष्टीने शालेय विद्यार्थ्यांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आचरणात आणण्याची खऱ्या अर्थाने गरज असल्याचे मत शिवप्रेमींकडून व्यक्त केले जात आहे. पंचक्रोशीतील जास्तीत जास्त नागरिकांनी शिवजयंती उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन सकल शिवप्रेमींकडून करण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe