मारुती सुझुकी भारतीय बाजारात आणखी एक दमदार SUV सादर करण्याच्या तयारीत आहे. ग्रँड विटाराची 7-सीटर एडिशन लवकरच बाजारात येण्याची शक्यता असून, ती सध्या चाचणी टप्प्यात आहे. अलीकडेच, हरियाणातील खारखोडा येथील मारुतीच्या नवीन उत्पादन युनिटजवळ या कारचे टेस्टिंग सुरू असल्याचे आढळले आहे.
7-सीटर ग्रँड विटाराचे फीचर्स
नवीन 7-सीटर SUV ही 5-सीटर ग्रँड विटाराच्या प्लॅटफॉर्मवर आधारित असेल, मात्र तिला वेगळा लूक आणि काही सुधारित फीचर्स मिळणार आहेत. यात लांब व्हीलबेससह अधिक प्रशस्त केबिन, नवीन डॅशबोर्ड डिझाइन, क्रोम-फिनिश असलेले एअर-कॉन वेंट्स आणि मोठी उभी फ्री-स्टँडिंग टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम असण्याची शक्यता आहे.

नाव काय असेल ?
मारुतीने अलीकडेच “Escudo” आणि “Torquenado” ही दोन नवीन ट्रेडमार्क नोंदवली आहेत. त्यामुळे या 7-सीटर SUV साठी त्यापैकीच एक नाव निवडले जाऊ शकते. ही कार सुझुकीच्या ग्लोबल C प्लॅटफॉर्मवर विकसित केली जाईल, जी सध्या ग्रँड विटारा आणि ब्रेझ्झामध्येही वापरण्यात आला आहे.
इंजिन आणि पॉवरट्रेन
7-सीटर ग्रँड विटारामध्ये विद्यमान ग्रँड विटाराप्रमाणेच 1.5-लीटर पेट्रोल आणि हायब्रिड पेट्रोल इंजिनचे पर्याय असण्याची शक्यता आहे. शिवाय, यात प्रगत ड्रायव्हर-असिस्टन्स सिस्टीम (ADAS) देखील मिळू शकते.
Grand Vitara 7 Seater किंमत
ही SUV भारतीय बाजारात Kia Carens, Hyundai Alcazar, MG Hector Plus, Tata Safari आणि Mahindra XUV700 यांसारख्या गाड्यांना टक्कर देईल. किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, तिची सुरुवातीची किंमत अंदाजे ₹14 लाख (एक्स-शोरूम) असू शकते, तर टॉप मॉडेल ₹22 लाखांपर्यंत जाऊ शकते.
लॉन्च कधी होणार ?
मारुती सुझुकीच्या 7-सीटर ग्रँड विटाराचे लाँच भारतीय ग्राहकांसाठी मोठी आकर्षण ठरू शकते. विस्तृत केबिन, हाय-टेक फीचर्स आणि विश्वासार्ह इंजिन पर्यायांमुळे ही SUV बाजारात जोरदार प्रवेश करण्याची शक्यता आहे. अधिकृत लॉन्च तारखेची प्रतीक्षा असून, येत्या काही महिन्यांत यासंदर्भात अधिक माहिती उपलब्ध होईल.