राज्यातील लाखो महिलांसाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahin Yojana) फेब्रुवारी महिन्याचा हप्ता वेळेच्या आधीच जमा होणार आहे. महिलांना महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हप्ता मिळण्याची अपेक्षा होती, मात्र वित्त विभागाने 3490 कोटी रुपये मंजूर केल्याने उद्यापासूनच पैसे खात्यात जमा होणार आहेत. ही योजना महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठी मोठा आधार ठरत आहे. मात्र, यावेळी जानेवारी महिन्याच्या तुलनेत फेब्रुवारीत लाभार्थींची संख्या कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
लाडकी बहीण योजनेचा हप्ता नेहमी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जमा होतो. मात्र, यावेळी फेब्रुवारीचा हप्ता अपेक्षेपेक्षा लवकरच जमा होणार आहे. वित्त विभागाने 3490 कोटी रुपये वितरित केल्याने उद्यापासून महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होईल.

महिलांना दरमहा 1500 रुपये
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यातील महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी सुरू करण्यात आली होती. 21 ते 65 वयोगटातील महिलांना योजनेचा लाभ मिळतो. कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावे ही योजनेची प्राथमिक अट होती, दरमहा 1500 रुपये थेट बँक खात्यात जमा होतात. ही योजना विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने जाहीर केली होती आणि ती महिलांसाठी मोठी आर्थिक मदत ठरत आहे.
कोणाला मिळणार नाही पैसे ?
महिला व बालविकास विभागाने योजनेतील अपात्र महिलांची तपासणी सुरू केली असून, अनेक महिलांना योजनेतून वगळण्यात आले आहे. अपात्र ठरण्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत: नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना लाडकी बहीण योजनेतून फक्त 500 रुपये मिळणार. दिव्यांग विभागाकडून लाभ घेणाऱ्या महिलांना योजनेतून वगळण्यात आले आहे.चारचाकी वाहने असलेल्या सुमारे 2.5 लाख महिलांना या योजनेतून बाहेर करण्यात आले आहे. निकषात न बसणाऱ्या महिलांनी स्वतःहून अनुदानाचे पैसे परत करायला सुरुवात केली आहे. योजनेतील पात्र महिलांची संख्याही लवकरच जाहीर केली जाणार आहे.
अनेक महिला अपात्र
सरकारच्या निर्णयाचा मोठा परिणाम झाला असून लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता राज्यातील महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. मात्र, यावेळी अनेक महिलांना योजनेतून वगळले जाण्याची शक्यता आहे. डिसेंबर 2024 पर्यंत 2 कोटी 46 लाख महिला लाभार्थी होत्या. 5 लाख महिला अपात्र ठरल्यानंतर जानेवारी 2025 अखेर लाभार्थींची संख्या 2 कोटी 41 लाख झाली. फेब्रुवारी अखेर ही संख्या आणखी घटण्याची शक्यता असून, 4 लाख महिलांना योजनेतून वगळण्यात येणार आहे.
9 लाख महिलांना पैसे मिळणार नाही
योजनेच्या अंमलबजावणीदरम्यान सरकारने निकषांमध्ये बसणाऱ्या आणि अपात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांची तपासणी सुरू केली आहे. त्यामुळे 9 लाख महिलांना योजनेतून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी 5 लाख महिलांची नावे हटवण्यात आली होती. आता 4 लाख महिलांची अधिक नावे काढण्यात येणार असल्याचे समजते. त्यामुळे राज्य सरकारच्या 945 कोटी रुपयांची बचत होणार आहे. ‘नमो शेतकरी योजना’ आणि ‘लाडकी बहीण योजना’ दोन्हीचा लाभ घेणाऱ्या महिलांपैकी 5 लाख महिलांना योजनेतून फक्त 500 रुपये मिळतील, तर उर्वरित 1000 रुपये ‘नमो शेतकरी योजने’तून मिळतील.