अहिल्यानगर तालुक्यातील देऊळगाव सिद्धी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील एका शिक्षिकेविरोधात गंभीर आरोप करण्यात आले असून, तिच्या चौकशीसाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने अधिकृत आश्वासन दिले आहे.
निवडुंगे (ता. पाथर्डी) येथील रहिवासी स्मिता अनिल ढोले या महिलने सदर शिक्षिकेविरोधात तक्रार दाखल केली होती आणि प्रशासनाने योग्य कारवाई न केल्यास जिल्हा परिषदेसमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. मात्र, शिक्षण विभागाने महिनाभरात चौकशी पूर्ण करून अहवाल सादर केला जाईल, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर तक्रारदार महिलेने आत्मदहनाचा निर्णय स्थगित केला आहे.

शिक्षिकेवर नेमके कोणते आरोप आहेत?
स्मिता ढोले यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात गंभीर आरोप केले आहेत. त्यानुसार, नगर तालुक्यातील प्राथमिक शाळेच्या एका शिक्षिकेने आपल्या पतीबरोबर गुपचूप विवाह केला. तसेच, शाळेवर हजर असल्याचे दाखवून तिने सोलापूर येथील एका रुग्णालयात बाळंतपण करून एका मुलाला जन्म दिला.
संबंधित शिक्षिका विवाहित असताना तिने घटस्फोट घेतल्याचे खोटे कागदपत्र दाखल केले. या खोट्या माहितीच्या आधारे तिने सोलापूर जिल्ह्यातून अहिल्यानगर जिल्ह्यात स्वतःची आंतरजिल्हा बदली करून घेतली.
ग्रामसभेचा ठराव नसतानाही मुख्यालयी राहत असल्याचे स्वयंघोषणापत्र दाखल करून ती घरभाडे भत्ता घेत होती. या सर्व प्रकारामुळे प्रशासनाची फसवणूक झाल्याचा आरोप तक्रारदार महिलेने केला आहे.
महिनाभरात चौकशी पूर्ण करून अहवाल सादर केला जाणार
शिक्षण विभागाने सदर शिक्षिकेविरुद्ध दोषारोप निश्चित केले असून, सहाय्यक आयुक्त, नाशिक यांच्याकडे २७ जून २०२४ रोजी त्याचा अहवाल पाठवण्यात आला आहे. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल. संबंधित शिक्षिका मुख्यालयी राहत नसल्याच्या तक्रारीबाबतही चौकशी केली जाणार आहे. महिनाभरात अहवाल पूर्ण करून शिक्षण विभागाकडे सादर केला जाईल.