पुणे-शिरूर मार्गावर वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः शिक्रापुरपासून पुढे पुणे शहराकडे जाताना होणारी वाहतूक कोंडी प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहे. मात्र, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांच्या संकल्पनेतून ६० किलोमीटर लांबीच्या तीन मजली उड्डाणपुलाच्या कामास एप्रिल महिन्यात सुरुवात होणार असल्याची माहिती खासदार नीलेश लंके यांनी दिली आहे.
तीन मजली उड्डाणपुलाचे वैशिष्ट्ये
खराडी बायपास ते शिरूरदरम्यान राज्यातील पहिल्या तीन मजली उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात होणार आहे. या प्रकल्पामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेल आणि प्रवास वेगवान होईल.

या पुलाचे तीन स्तर असे असतील:
सर्वात वरच्या स्तरावर महामेट्रो धावणार.मधल्या स्तरावर चारचाकी वाहनांसाठी वेगळी मार्गव्यवस्था असेल. ळमजल्यावरून अवजड वाहने सहजपणे प्रवास करू शकतील.
शिरूर, रांजणगाव गणपती, शिक्रापूर, लोणीकंद आणि खराडी येथे या उड्डाणपुलास बाह्य मार्ग जोडण्यात येणार आहेत.
या प्रकल्पामुळे पुणे आणि शिरूर दरम्यानचा प्रवास अधिक वेगवान आणि सुरक्षित होणार आहे. तसेच, महामेट्रो, चारचाकी आणि अवजड वाहनांसाठी स्वतंत्र वाहतुकीच्या व्यवस्थेमुळे रस्ता अपघात आणि ट्रॅफिक जामच्या समस्या मोठ्या प्रमाणात कमी होतील.
सहा पदरी महामार्ग आणि काँक्रीटीकरणाची मागणी
छत्रपती संभाजीनगर-अहिल्यानगर-पुणे महामार्गाचे सहा पदरीकरण आणि काँक्रीटीकरण करण्याची मागणी खासदार नीलेश लंके, शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदिपान भुमरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली होती.
या मागणीच्या पार्श्वभूमीवर खा. लंके यांनी संसदेच्या अधिवेशनादरम्यान गडकरी यांची भेट घेतली होती. त्यावेळी गडकरींनी खराडी बायपास ते शिरूर तीन मजली उड्डाणपुलाच्या कामाला लवकरच सुरुवात होईल, तसेच शिरूर ते संभाजीनगर दरम्यानच्या रस्त्यांसाठी राज्य सरकारशी चर्चा सुरू असल्याचे सांगितले.