२२ फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : तुम्ही जर साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला जाणार असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्वाची आहे. कारण शिर्डी हे जागतिक कीर्तीचे साईबाबांचे पवित्र स्थान आहे. येथे रोज लाखो भाविक दर्शनासाठी येतात.त्यामुळे शहरातील स्वच्छतेला आणि सुशोभीकरणाला बाधा पोहोचू नये, यासाठी नगरपरिषद विशेष प्रयत्न करत आहे.
त्यानुसार शिर्डीत सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर थुंकल्यास तुमच्यावर कारवाई देखील होवू शकते.आतापर्यत असे रस्त्यावर थुंकणाऱ्या नागरिकांवर कठोर कारवाई करत शिर्डी नगरपरिषदेच्या नारीशक्ती पथकाने २२४ नागरिकांकडून तब्बल १३,७०० रुपये दंड वसूल केला आहे.

त्यामुळे आता शिर्डीत उघड्यावर थुंकणे नागरिकांना चांगलेच महागात पडणार आहे. ही कारवाई सातत्याने सुरू राहणार असून, शहर स्वच्छ, सुंदर व हरित ठेवण्याच्या उद्देशाने नारीशक्ती पथक अधिक जोमाने कार्यरत राहणार आहे,अशी माहिती नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक सतीश दिघे यांनी दिली.
शिर्डी शहरात मुख्याधिकारी सतीश दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘माझी वसुंधरा अभियान’ व ‘स्वच्छ महाराष्ट्र अभियान’ प्रभावीपणे राबविले जात आहे. राज्य शासनाद्वारे पृथ्वी, जल, वायू, अग्नी व आकाश या पंच तत्त्वांवर आधारित ‘माझी वसुंधरा अभियान’ सुरू आहे, आणि त्याचा शिर्डीत उत्तम प्रतिसाद दिसून येत आहे.शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी शिर्डी नगर परिषदेकडून कठोर पावले उचलली जात आहेत.
याच मोहिमेचा एक भाग म्हणून नगरपरिषदेने नोव्हेंबर २०२४ पासून आज पर्यंत २२४ नागरिकांकडून १३,७०० रुपये दंड वसूल केला आहे.या कठोर कारवाईमुळे शहरातील सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे.
भाविकांनी स्वच्छतेचा संदेश घेऊन जावा,सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये किंवा अस्वच्छता निर्माण करू नये,ही जबाबदारी सर्व नागरिकांची आहे.यासाठी शिर्डी शहरातील विविध ठिकाणी ‘उघड्यावर थुंकू नका’ असे फलक लावण्यात येणार आहेत आणि अधिक जनजागृती केली जाणार आहे.शिर्डीतील स्वच्छता टिकवण्यासाठी आणि शहराला अधिक सुंदर ठेवण्यासाठी नगरपरिषदेच्या नारीशक्ती पथकाची ही मोहिम भविष्यातही सुरूच राहणार असल्याचे पालिका सूत्रांनी सांगितले.