शिवजयंती मिरवणुकीत गँगस्टर बिश्नोईचा फलक झळकवणारा सापडला ; गोडसेचा फलक झळकवणारा कोण ? पोलिसांचा शोध सुरू

Published on -

२२ फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंती निमित्ताने देश-विदेशातून अभिवादन करण्यात आले.अहिल्यानगर शहर तसेच जिल्ह्यातही शिवजयंती विविध उपक्रमांनी धूमधडाक्यात साजरी करण्यात आली.शहरात शिवजयंती मिरवणूक किरकोळ प्रकार वगळता शांततेत पार पडली.

मात्र शिवजयंती मिरवणुकीत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणारे नथुराम गोडसे तसेच गॅंगस्टर लॉरेन्स बिश्नोईचे फलक झळकले. या घटनेने शहरासह संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. सर्वच माध्यमांवर हा विषय बहुचर्चित झाला आहे. या प्रकरणी जिल्हा पोलिस दलाने कडक पावले उचलली असून, फलक झळकविणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात आली आहे.

ओंकार बाळासाहेब धारूरकर (रा. सोनार गल्ली, कर्जत) असे कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे.
शिवजयंती निमित्त अहिल्यानगर शहरात १९ फेब्रुवारी रोजी डीजेच्या दणदणाटात ५ मंडळांनी मिरवणुका काढल्या होत्या.त्यातील एका मंडळाची मिरवणूक तख्ती दरवाजा येथे आली असता त्या मिरवणुकीत एका तरुणाने खंडणी व खुनाच्या गुन्ह्यातील कुख्यात गुन्हेगार लॉरेन्स बिश्नोई याचा फोटो असलेला फलक झळकावला.

त्या फलकाच्या पाठीमागे ‘जिहाद्यांचा बाप’ असा मजकूर असलेला मंत्री नितेश राणे यांचाही फलक झळकवण्यात आला. सदरची दृश्ये प्रसार माध्यमांच्याद्वारे प्रसारित झाली. सोशल मिडीयावर ती व्हायरल झाली.त्यानंतर कोतवाली पोलिसांनी सदर फलक झळकवणाऱ्याचा शोध घेतला असता तो ओंकार बाळासाहेब धारूरकर हा असल्याचे समोर आले.

कोतवाली पोलिस ठाण्यातील गोपनीय शाखेतील सहाय्यक फौजदार राजेंद्र गर्गे यांनी २० फेब्रुवारीला रात्री उशिरा फिर्याद दिली. या फिर्यादीवरून ओंकार धारूरकर याच्या विरुद्ध कोणत्याही व्यक्तीच्या आकृती किंवा त्याचे प्रतिमाचे प्रदर्शन करण्यास मनाई करणारा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेला असतानाही त्या आदेशाचा भंग करत विनापरवानगी खंडणी व खुनाच्या गुन्ह्यातील कुख्यात गुन्हेगार लॉरेन्स बिश्नोई याचे फलक झळकविल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान या मिरवणुकीत आणखी एका मंडळापुढे नाचताना एकाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणारा नथुराम गोडसे याचा फोटो असलेला फलक झळकविलेला व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झालेला असून पोलिस त्या व्यक्तीचा कसून शोध घेत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe