Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भविष्यातील निर्णयांबाबत मोठी चर्चा रंगली आहे. मागील काही दिवसांपासून शिंदे हे महायुतीत नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची भूमिका आणि मुख्यमंत्री पदावरून शिंदे आणि फडणवीस यांच्यात वाढलेली दरी हे या चर्चांचे मुख्य कारण आहे. काही महत्त्वाच्या मंत्रिमंडळ बैठकींना शिंदे गैरहजर राहिले, तसेच “मला हलक्यात घेऊ नका, मी काय करू शकतो, हे 2022 मध्ये दिसलं” या त्यांच्या वक्तव्यामुळे या चर्चांना अधिक धार आली. शिंदे यांच्या या वक्तव्याचा रोख महाविकास आघाडीवर असल्याचे सांगितले जात असले तरी, हा इशारा थेट भाजपला आहे, असेही मानले जात आहे.
शिंदेंचा महायुतीमधून बाहेर पडण्याचा निर्णय ?
शिंदे यांच्यातील अस्वस्थता आणि नाराजीच्या पार्श्वभूमीवर, त्यांनी महायुतीमधून बाहेर पडण्याचा एक्झिट प्लॅन सक्रिय केला आहे का? हा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा पुणे दौरा आणि त्यासंदर्भातील शिंदे यांचा निर्णय. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शुक्रवारी उशिरा पुण्यात दाखल झाले आणि आज पुण्यात विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. या सर्व कार्यक्रमांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती निश्चित आहे, मात्र एकनाथ शिंदे हे गैरहजर राहणार आहेत.

अमित शाह यांच्या पुणे दौऱ्यातून शिंदे गायब
अमित शाह यांच्या दौऱ्यातील काही कार्यक्रम राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत. पश्चिम विभागीय गृह विभागाची बैठक, महाराष्ट्र-गुजरात-गोवा आणि केंद्रशासित प्रदेशांतील सुरक्षा यंत्रणांबाबतच्या चर्चा आणि काही अन्य धोरणात्मक निर्णय या दौऱ्यात घेतले जाणार आहेत. याशिवाय, आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपच्या प्रचार यंत्रणेच्या तयारीसाठीही हा दौरा महत्त्वाचा आहे. मात्र, या बैठकींमध्ये एकनाथ शिंदे हे अनुपस्थित राहणार आहेत, ही बाब राजकीयदृष्ट्या मोठा संकेत मानली जात आहे. त्यांच्या अनुपस्थितीमुळे, शिंदेंनी भाजपपासून अंतर वाढवण्यास सुरुवात केली आहे का? असा सवाल उपस्थित होतो.
महायुतीतील अंतर्गत संघर्ष आणि पुढील राजकीय समीकरणे
शिंदे गट हा गेल्या वर्षभरात भाजपसोबत राहिला असला तरी, मुख्यमंत्रिपदाच्या अधिकारांबाबत त्यांची अस्वस्थता वाढली आहे. भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मुख्य निर्णय फडणवीस आणि अजित पवार यांच्याकडे केंद्रित केल्याने शिंदे यांना बाजूला ठेवले जात असल्याची भावना त्यांच्या गटात आहे. याच पार्श्वभूमीवर, शिंदे गट वेगळा निर्णय घेणार का? हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो. मागील महिन्याभरात त्यांच्या समर्थक आमदारांनीही आम्हाला स्थानिक पातळीवर कोणतेच स्वायत्त निर्णय घेता येत नाहीत असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे शिंदे गट भाजपपासून दूर जात आहे का ? आणि महायुतीतून बाहेर पडण्याचा अंतिम निर्णय कधी घेतला जाईल ? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.