अहिल्यानगर : प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण टप्पा २ मधील घरकुल लाभार्थ्यांना मंजुरी पत्र वितरण व प्रथम हप्ता वितरण शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते ऑनलाइन करण्यात येणार आहे.जिल्हास्तरावर हा कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या वतीने सहकार सभागृहात दुपारी ३ वाजता होणार असून त्यास विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित राहणार आहेत.
प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण टप्पा-२ अंतर्गत सन २०२४-२५ मध्ये महाराष्ट्र राज्याला केंद्र शासनाकडून २० लाख लाभार्थ्यांचे वाढीव उद्दिष्ट देण्यात आले.या उद्दिष्टापैकी महाराष्ट्र राज्याने १८.२५ लाख (९३ टक्के) लाभार्थ्यांना घरकुले मंजूर केली आहेत.मंजुरीची प्रक्रिया राज्यात १५ दिवसांत पूर्ण करण्यात आली.

अहिल्यानगर जिल्ह्यासाठी ८२ हजार ९६८ घरकुल लाभार्थ्यांचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे.त्यापैकी ८१ हजार १५ (९७.६ टक्के) लाभार्थ्यांना घरकुले मंजूर केली आहेत.ही प्रक्रिया जिल्ह्याने ८ दिवसांत पूर्ण केली आहे.
घरकुल मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना मंजुरी पत्र देणे व मंजूर लाभार्थ्यांपैकी १० लाख लाभार्थ्यांना प्रथम हप्ता एकाच वेळी (ऑनलाइन एकाच क्लिकवर) वितरण शनिवारी (दि. २२) दुपारी ४:४५ वाजता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास व पंचायतराज्ञ मंत्री जयकुमार गोरे, ग्रामविकास राज्यमंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत होणार आहे.
हा कार्यक्रम बालेवाडी (पुणे) येथे होणार आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने दूरदृष्य प्रणालीद्वारे जिल्हा, तालुका व ग्रामपंचायत स्तरावर घरकुल लाभार्थ्यांना मंजुरी पत्र व प्रथम हप्ता वितरण करण्यात येणार आहे.
५०१७४ लाभार्थ्यांना मिळणार पहिला हप्ता
अहिल्यानगर जिल्ह्यातील एकूण ८१ हजार १५ लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीचे पत्र व शासनाने प्रथम हप्ता वितरणासाठी दिलेल्या ४६ हजार १९६ उद्दिष्टापेक्षा जास्त ५० हजार १७४ (१०९ टक्के) लाभार्थ्यांना प्रथम हप्त्याचे वितरण होणार आहे.