DA Hike 2025 : वर्ष 2025 हे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी विशेष खास ठरणार आहे. अपेक्षेप्रमाणे केंद्रातील सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नुकतीच आठवावेतन आयोगाची घोषणा केली आहे आणि आता त्यांचा महागाई भत्ता सुद्धा वाढवला जाणार आहे. खरे तर महागाई भत्ता हा दरवर्षी वाढत असतो यात काही नवीन नाही. मात्र महागाई भत्ता नेमका कितीने वाढणार? याविषयी जाणून घेण्याची सरकारी कर्मचाऱ्यांना उत्सुकता असते.
दरवर्षी सरकारी कर्मचाऱ्यांना दोनदा महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळतो. मार्च महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांचा जानेवारी महिन्यापासून चा महागाई भत्ता सुधारित केला जात असतो आणि ऑक्टोबर महिन्यात जुलै महिन्यापासूनचा महागाई भत्ता सुधारित केला जात असतो. दरम्यान पुढल्या महिन्यात म्हणजेच मार्च 2025 मध्ये जानेवारी 2025 पासून चा महागाई भत्ता ठरवला जाणार आहे.

अशा स्थितीत आज आपण यावेळी सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता कितीने वाढणार, सध्या त्यांना काय दराने महागाई भत्ता मिळतोय, महागाई भत्ता कशावरून ठरतो, महागाई भत्ता वाढीनंतर सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार कितीने वाढणार? याच साऱ्या मुद्द्यांचा तपशीलवार आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता कितीने वाढणार?
सध्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना 53% दराने महागाई भत्ता मिळतोय. हा महागाई भत्ता दर जुलै 2024 पासून लागू आहे. आता जानेवारी 2025 पासून नवीन दर लागू होणार आहेत. गेल्यावेळी म्हणजे ऑक्टोबर 2024 मध्ये सरकारने जुलै 2024 पासूनचा महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढवला होता.
दरम्यान आता यावेळी केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पुन्हा एकदा तीन टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. खरे तर महागाई भत्ता वाढ ही एआयसीपीआयच्या आकडेवारीनुसार ठरते. जुलै ते डिसेंबर 2024 या कालावधीमधील आकडेवारीनुसार जानेवारी महिन्यापासून महागाई भत्ता कितीने वाढणार हे ठरणार आहे.
या एआयसीपीआयच्या आकडेवारीवर जर नजर टाकली तर जुलै 2024 मध्ये एआयसीपीआयचे निर्देशांक 142.7% इतके होते आणि महागाई भत्ता दर 53.50% राहिलेत. ऑगस्ट 2024 मध्ये 142.6 आणि महागाई भत्ता दर 53.80 इतके राहिलेत.
सप्टेंबर 2024 मध्ये निर्देशांक 143.5 आणि महागाई भत्ता दर 54.20% इतके राहिलेत. ऑक्टोबर 2024 मध्ये निर्देशांक 144.5 आणि महागाई भत्ता दर 55.20 इतके राहिलेत. नोव्हेंबर मध्ये निर्देशांक कायम राहिलेत पण महागाई भत्ता दर 55.60% इतके झालेत.
डिसेंबर मध्ये निर्देशांक 143.7 आणि महागाई भत्ता दर 56% इतका नमूद करण्यात आला. या आकडेवारीनुसार केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना जानेवारी 2025 पासून 56 टक्के दराने महागाई भत्ता मिळणार आहे. सध्या त्यांना 53% दराने भत्ता मिळतोय याचाच अर्थ यामध्ये तीन टक्क्यांची वाढ होणार आहे.
महागाई भत्ता वाढीचा निर्णय नेमका कधी होणार
खरंतर दरवर्षी मार्च महिन्यात सरकारकडून महागाई भत्ता वाढीबाबतचा निर्णय घेतला जात असतो. होळी सणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील सरकार दरवर्षी केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवत असते. यंदाही होळीच्या आधीच केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीची भेट मिळणार असे बोलले जात आहे. केंद्रातील मोदी सरकार पुढील महिन्यात होणाऱ्या केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्याचे दाट शक्यता आहे. मात्र याबाबत कोणतीचं अधिकृत माहिती हाती आलेली नाही.
महागाई भत्ता वाढीनंतर पगार कितीने वाढणार?
महागाई भत्ता वाढीचा निर्णय पुढल्या महिन्यात म्हणजेच मार्च महिन्यात होणार आहे, मात्र ही वाढ जानेवारी 2025 पासून लागू राहील आणि यामुळे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा दिली जाणार आहे.
पगारवाढीबाबत बोलायचं झालं तर सध्या 18000 मूळ पगार असणाऱ्या कर्मचाऱ्यांना 53 टक्के दराने 9540 महागाई भत्ता मिळतोय मात्र 56% महागाई भत्ता झाल्यानंतर 18000 रुपये मूळ पगार असणाऱ्या कर्मचाऱ्यांना दहा हजार 80 रुपये महागाई भत्ता मिळणार आहे. अर्थातच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात दरमहा 540 रुपयांची वाढ होणार आहे. वार्षिक आधारावर कर्मचाऱ्यांच्या पगारात 6,480 रुपयांची वाढ होईल.