मराठी भाषा आणि संस्कृतीच्या सन्मानासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असतानाच भारतीय रेल्वेच्या व्यवस्थापनात मराठी भाषेची अवहेलना होत असल्याचे गंभीर वास्तव समोर आले आहे. केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली असलेल्या ‘इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅन्ड टुरिझम कॉर्पोरेशन’ने (IRCTC) वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये मराठी वर्तमानपत्रांना दुय्यम स्थान दिले आहे, ज्यामुळे महाराष्ट्रातील प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये हिंदी, इंग्रजी आणि गुजराती वर्तमानपत्र मोफत उपलब्ध आहेत, मात्र मराठी वर्तमानपत्रांचा समावेश नाही. ही बाब मराठी भाषिक प्रवाशांसाठी अत्यंत खेदजनक आणि संतापजनक आहे. विशेष म्हणजे मुंबईसारख्या महाराष्ट्राच्या हृदयस्थानी सुरू होणाऱ्या रेल्वेगाडीतच मराठी वर्तमानपत्र वगळले जात आहेत, यावरून रेल्वे प्रशासनाचा मराठी भाषेच्या अनास्थेचा मुद्दा प्रकर्षाने समोर येत आहे.

वर्तमानपत्रे प्रवाशांना मोफत
भारतीय रेल्वेने राष्ट्रीय आणि स्थानिक भाषांमध्ये वर्तमानपत्रे प्रवाशांना मोफत उपलब्ध करून देण्याचे धोरण आखले आहे.राजधानी, शताब्दी, आणि अन्य गाड्यांमध्ये प्रवाशांना हिंदी आणि इंग्रजीसोबतच संबंधित राज्यातील स्थानिक भाषेतील वर्तमानपत्रे दिली जातात. मात्र, वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये मराठी वर्तमानपत्रांना स्थान न मिळणे हे महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी मोठी उपेक्षा आहे.
मराठी वर्तमानपत्र का नाही ?
विशेष म्हणजे, गुजरातहून सुटणाऱ्या शताब्दी एक्स्प्रेसमध्ये गुजराती वर्तमानपत्र उपलब्ध करून दिले जाते, मग मुंबईतून सुटणाऱ्या वंदे भारतमध्ये मराठी वर्तमानपत्र का दिले जात नाही ? हा प्रश्न प्रवाशांनी उपस्थित केला आहे. गेल्या महिन्यातही शताब्दी एक्स्प्रेसमध्ये फक्त इंग्रजी आणि गुजराती वर्तमानपत्र दिली जात असल्याने प्रवाशांनी रेल्वे प्रशासनावर टीका केली होती.
प्रवाशांमध्ये मोठा संताप
वंदे भारत एक्स्प्रेसमधील मराठी वर्तमानपत्रांच्या अभावाबाबत विचारणा केल्यावर रेल्वे प्रशासनाकडून कोणतेही समाधानकारक उत्तर देण्यात आलेले नाही. प्रवाशांनी याबाबत विचारले असता रेल्वे प्रशासनाने मराठी वर्तमानपत्रांचा समावेश का नाही याबाबत मौन बाळगले आहे. यामुळे महाराष्ट्रातील प्रवाशांमध्ये मोठा संताप आहे आणि मराठी वर्तमानपत्रांना वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये स्थान मिळावे, यासाठी अनेक प्रवासी रेल्वे मंत्रालयाकडे तक्रारी करत आहेत. काही प्रवाशांनी याबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी तक्रारही केली आहे.