Breaking ! एसटी प्रवासात महिलांचे ‘हाफ तिकीट’ बंद होणार ? एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

Published on -

राज्यातील महिलांना एसटी प्रवासात 50% सवलत मिळत असल्याने लाखो महिला याचा लाभ घेत आहेत. मात्र, अलीकडेच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या एका वक्तव्यामुळे या सवलतीबाबत संभ्रम निर्माण झाला होता. ही सवलत बंद होणार असल्याची चर्चा सुरू झाली होती, ज्यामुळे अनेक महिलांमध्ये चिंता व्यक्त केली जात होती. या चर्चांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट उत्तर दिले असून महिलांना मोठा दिलासा दिला आहे.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काय म्हटले होते ?

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एका कार्यक्रमात बोलताना एसटी महामंडळाच्या तोट्याचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, एसटी महामंडळ दररोज 3 कोटी रुपयांच्या तोट्यात जात आहे. याचे एक कारण म्हणजे महिलांना 50 टक्के सवलत तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी लागू असलेल्या सूट योजना आहेत. सरनाईक म्हणाले, “आपण सर्वांनाच सवलत देत बसलो तर एसटी महामंडळ चालवणे कठीण होईल.” त्यांच्या या विधानामुळे महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या सवलती बंद होणार का ? असा प्रश्न निर्माण झाला.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले स्पष्टीकरण

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला असून एसटी सवलती बंद होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. ते म्हणाले, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. त्याचबरोबर एसटी बस प्रवासात लाडक्या बहिणींना देण्यात आलेली 50 टक्के सवलत बंद केली जाणार नाही. तसेच ज्येष्ठ नागरिकांनाही मिळणारी सवलत पूर्ववत सुरू राहील.शिंदे यांच्या या स्पष्ट भूमिकेमुळे राज्यातील महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

महिलांसाठी एसटी सवलतीचे महत्त्व

राज्यातील लाखो महिला रोजच्या प्रवासासाठी एसटी सेवेचा वापर करतात. ग्रामीण भागातील महिलांसाठी ही सवलत आर्थिकदृष्ट्या खूप महत्त्वाची आहे. शिक्षण, नोकरी, व्यवसाय, वैद्यकीय सेवा, आणि इतर आवश्यक कामांसाठी महिलांना स्वस्त आणि विश्वासार्ह प्रवास सेवा मिळावी म्हणून ही योजना सुरू करण्यात आली होती. तसेच, ज्येष्ठ नागरिकांना प्रवास अधिक सोपा करण्यासाठी त्यांना देखील सवलत दिली जाते. त्यामुळे, या सवलती बंद झाल्यास हजारो नागरिकांवर मोठा परिणाम झाला असता.

शिंदे यांच्या या स्पष्ट भूमिकेमुळे महिला प्रवाशांनी सुटकेचा श्वास टाकला आहे. महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या सवलती बंद होणार नसल्याची खात्री देऊन सरकारने मोठा दिलासा दिला आहे. त्यामुळे, राज्यातील महिला आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण असून एसटी महामंडळाचा प्रवास सुरू राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe