भारतातील वाहन बाजारात गेल्या काही वर्षांत सीएनजी आणि इलेक्ट्रिक गाड्यांचे वर्चस्व वाढले आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे अनेक लोक इंधन-पर्याय शोधत आहेत. सीएनजी कार्सचा ट्रेंड वाढत असून, त्या केवळ स्वस्त नाहीत, तर पर्यावरणपूरक आणि मायलेजच्या बाबतीतही उत्तम पर्याय ठरतात.
जर तुम्ही ८ ते १० लाख रुपयांच्या बजेटमध्ये नवीन CNG कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आम्ही तुम्हाला अशा काही सर्वोत्तम पर्यायांबद्दल सांगणार आहोत, जे तुमच्या खिशाला परवडतील आणि मायलेजसुद्धा उत्तम देतील.

जर तुम्हाला एसयूव्ही स्टाईल आणि मजबूत बिल्ड असलेली कार हवी असेल तर टाटा पंच सीएनजी हा उत्तम पर्याय आहे. मायलेज आणि किफायतशीर ऑप्शन शोधत असाल तर मारुती सुझुकी स्विफ्ट सीएनजी तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो.
टाटा पंच सीएनजी – मजबूत डिझाईन आणि चांगलं मायलेज
टाटा पंच सीएनजी ही 2024 मधील सर्वाधिक विक्री होणाऱ्या कॉम्पॅक्ट एसयूव्हींपैकी एक आहे. तिचे सुरक्षिततेचे उच्च मानदंड, मजबूत डिझाईन आणि उत्तम मायलेज यामुळे ती ग्राहकांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाली आहे. ही कार 1.2 लिटर, 3-सिलेंडर पेट्रोल इंजिन वर चालते, जे 73.5 bhp पॉवर आणि 103 Nm टॉर्क निर्माण करते. मायलेजबाबत बोलायचे झाले तर ही कार 27 km/kg पर्यंत मायलेज देऊ शकते. याची एक्स-शोरूम किंमत ₹7.30 लाख पासून सुरू होते. उत्कृष्ट सेफ्टी फीचर्स, एसयूव्ही लूक आणि कमी इंधन खर्च यामुळे टाटा पंच सीएनजी हा एक चांगला पर्याय ठरतो.
मारुती सुझुकी स्विफ्ट सीएनजी – सर्वोत्तम मायलेज असलेली हॅचबॅक
मारुती सुझुकी स्विफ्ट सीएनजी ही भारतातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या हॅचबॅक कारपैकी एक आहे. आकर्षक डिझाईन, उत्तम परफॉर्मन्स आणि उच्च मायलेज यामुळे ती ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहे. ही कार 1.2 लिटर, 3-सिलेंडर पेट्रोल इंजिन वर चालते, जे 69.75 bhp पॉवर आणि 101.8 Nm टॉर्क निर्माण करते. मायलेजच्या बाबतीत ही कार 32.85 km/kg पर्यंत इंधन कार्यक्षमता देते, जी भारतीय बाजारात सर्वोत्तम मानली जाते. याची एक्स-शोरूम किंमत ₹8.19 लाख आहे. स्वस्त मेंटेनन्स, मजबूत परफॉर्मन्स आणि उत्तम मायलेज यामुळे स्विफ्ट सीएनजी ही लांब पल्ल्याच्या प्रवासासाठीही एक उत्कृष्ट पर्याय आहे.
सीएनजी कार का निवडावी ?
सीएनजी कार घेतल्याने अनेक फायदे मिळतात. इंधन खर्च पेट्रोल आणि डिझेलपेक्षा कमी असल्यामुळे लांब पल्ल्याचा प्रवासही परवडणारा होतो. याशिवाय सीएनजीचे प्रति किलो जास्त मायलेज मिळते, त्यामुळे वारंवार इंधन भरण्याची गरज लागत नाही. सीएनजी पर्यावरणपूरक इंधन असल्याने कार्बन उत्सर्जन कमी होते आणि प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. याशिवाय सीएनजी इंजिनची आयुष्य जास्त असते आणि मेंटेनन्स खर्च तुलनेने कमी येतो. भारतभर वाढत असलेल्या सीएनजी स्टेशन नेटवर्कमुळे आता सीएनजी वाहनांना अधिक चांगले इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध होत आहे, त्यामुळे आता सीएनजी वाहन खरेदी करणे अधिक सोयीचे आणि फायदेशीर ठरत आहे.