SBI Home Loan EMI : तारीख 7 फेब्रुवारी 2025, याच दिवशी आरबीआयने पाच वर्षानंतर सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला. आरबीआय ने रेपो रेट मध्ये पाच वर्षांनी पहिल्यांदाच कपात केली, तर दोन वर्षांनी पहिल्यांदाच रेपो रेट बदललेत.
आरबीआयने रेपो रेट 6.50 टक्क्यांवरून 6.25 टक्क्यांपर्यंत कमी केलेत. रेपो रेटमध्ये 0.25 टक्यांची कपात झाल्याने गृह कर्जाचे सर्वच प्रकारच्या कर्जांचे ईएमआय आता कमी होऊ लागले आहेत.

आरबीआयच्या निर्णयानंतर आता देशातील अनेक प्रमुख बँका आपल्या कर्जांचे व्याजदर कमी करत आहेत. दरम्यान 15 फेब्रुवारीला एसबीआय ने एक मोठा निर्णय घेतला असून गृह कर्जाच्या व्याजदरात 25 बेसिस पॉईंट ने कपात करण्यात आली आहे.
अर्थातच व्याजदर 0.25 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय बँकेकडून घेण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे बँकेचा हा निर्णय 15 फेब्रुवारी 2025 पासूनच लागू करण्यात आला आहे.
एसबीआय ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असून या बँकेने एक्स्टर्नल बेंचमार्क बेस्ड लेंडिंग रेट म्हणजेच ईबीएलआर आणि रेपो लिंक लेंडिंग रेट म्हणजे आरएलएलआर सुद्धा कमी केले आहेत.
त्याचा परिणाम म्हणून आता सर्वसामान्यांचा ईएमआय कमी होणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण होम लोनचा EMI नेमका कितीने कमी होणार? याचे संपूर्ण कॅल्क्युलेशन थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
EMI कितीने कमी होणार?
जर एखाद्या ग्राहकाने एसबीआय कडून वीस वर्षांसाठी 50 लाखाचे गृह कर्ज घेतले असेल तर अशा व्यक्तीचा ईएमआय कितीने कमी होणार याचे गणित आता आपण पाहूयात.
जुन्या दरानुसार म्हणजेच 8.50% दरानुसार वीस वर्षांसाठी 50 लाखाच्या गृह कर्जासाठी 43 हजार 391 रुपयांचा ईएमआय द्यावा लागला असता. म्हणजे सदर ग्राहकाला एक कोटी चार लाख 13 हजार 879 रुपये बँकेत भरावे लागणार होते, यात 54 लाख 13 हजार 879 रुपये हे व्याजाचे असते.
मात्र आता नवीन दरानुसार सदर ग्राहकाला फक्त 42 हजार 603 रुपयांचा एमआय भरावा लागणार आहे. म्हणजेच ग्राहकाला एक कोटी दोन लाख 24 हजार 788 रुपये बँकेला द्यावे लागणार आहेत.
यामध्ये 52 लाख 24 हजार 788 रुपये हे व्याजाचे राहणार आहेत. म्हणजेच नव्या दरानुसार ग्राहकाचे एक लाख 88 हजार 460 रुपये वाचणार आहेत. अर्थात दरमहा 785 रुपयांची बचत होणार आहे.