अहिल्यानगर : राहाता येथील एकाच्या छातीवर तसेच डोक्यात तलवारीने सपासप वार करून, एकाच खून केला होता. या खून प्रकरणी सहा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. राहाता येथील जिल्हा व अतिरीक्त सत्र न्यायालयाने हा निकाल दिला आहे. याबाबत समजलेली माहिती अशी, की दि. २३ मे २०२२ रोजी श्रीरामपूर येथील कुकी हॉटेलमध्ये झालेल्या वादातून हा गुन्हा घडला.
फिर्यादीचा मुलगा योगेश किसन वाघमारे याचा पाठलाग करून आरोपींनी त्याला राहात्यातील आंबेडकरनगर येथील संजय दादा निकाळे यांच्या घरी नेले. तेथे रवी दशरथ कटारनवरे याने त्याच्या छातीत तलवारीने वार केला. संजय निकाळे व ललित बाबासाहेब पाळदे यांनी योगेश वाघमारेच्या डोक्यात व हाताच्या बोटांवर वार करून त्याचा निर्घृण खून केला. तसेच साक्षीदारांना मारहाण करून जखमी करण्यात आले.

या प्रकरणी राहाता पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम ३०२, ३६३, ३२४, १४३, १४७, १४८, १४९, ५०४, ५०६ आणि आर्म्स ॲक्ट ४/२५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी एकूण १८ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास अधिकारी पोलीस निरीक्षक सुनिल गायकवाड यांनी सखोल तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते.
खटल्याच्या सुनावणीदरम्यान एकूण नऊ साक्षीदार तपासण्यात आले. प्रत्यक्षदर्शी व अन्य साक्षीदारांच्या जबानी तसेच सरकारी वकीलांच्या प्रभावी युक्तिवादाच्या आधारे न्यायालयाने सहा आरोपींना जन्मठेप व प्रत्येकी ३५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. शिक्षा झालेल्या आरोपींची नावे राहुल एकनाथ धिवर, ललित बाबासाहेब पाळंदे, रवि दशरथ कटारनवरे, विरेन उर्फ पिंटू दशरथ कटारनवरे, विशाल मायकेल मोकळ आणि योगेश संजय निकाळे (सर्व रा. आंबेडकरनगर, राहाता) अशी आहेत.
याप्रकरणी एकूण १८ आरोपींविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता.या खटल्यात सरकारी पक्षातर्फे अभियोक्ता डी. बी. पानगवाणे व पी. व्ही. बुलबुले यांनी प्रभावी युक्तिवाद केला, तर त्यांना सरकारी अभियोक्ता मयुरेश नवले यांनी सहाय्य केले. तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक (श्रीरामपूर) वैभव कलुबर्मे, शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने, राहाता पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पैरवी अधिकारी हेड कॉन्स्टेबल साईनाथ कुदळ यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.