Ahilyanagar News : खासदारकीच्या माध्यमातून अहिल्यानगर जिल्हयात दहशतीची कीड पसरली होती;परंतू पारनेर, नगर मतदारसंघातील सूज्ञ मतदारांनी ही कीड नष्ट करण्याचे काम केल्याने जिल्हा शांत झाल्याचे सांगत आ. काशीनाथ दाते यांनी खा. नीलेश लंके यांचे नाव न घेता टीकास्त्र सोडले.
देवीभोयरे ग्रामस्थांच्या वतीने विधानसभा निवडणुकीत विजय मिळाल्याबद्दल आ. दाते यांचा नागरी सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना आ. दाते बोलत होते. डॉ. भाऊसाहेब खिलारी हे अध्यक्षस्थानी होते. देवीभोयरेचे मा. उपसरपंच विकास सावंत व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेली नवसपूर्ती अंबिका देवीच्या मंदिरात दाते यांची गुळतुला करू करण्यात आली.

आ. दाते म्हणाले, जनतेने आपल्यावर विश्वास टाकला असून, त्यास तडा न जाऊ देता विकासकामे मार्गी लावण्यात येतील. गेली पाच वर्षे तालुका दहशतीलखाली होता. गेली चाळीस वर्षे आपण सामाजिक काम केले. त्यावर विश्वास ठेऊन जनतेने दहशत मोडून काढत मला संधी दिली. आता तालुक्यातील पाटपाण्याचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्राधान्य देणार आहोत.
विधानसभेमध्ये लक्षवेधी सुचनेद्वारे विविध सूचना केल्यानंतर त्याची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून, मतदारसंघाचे प्रश्न तातडीने माग लागणार आहेत. कुकडी डावा कालवा व पिंपळगाव जोगा कालवा अस्तरीकरणाचा प्रश्न मार्गी लागला आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून या कामासाठी निधी मंजूर केल्याने हे काम लवकरच सुरू होणार असल्याचे दाते म्हणाले.
आ. काशिनाथ दाते हे कार्यक्षम नेतृत्व मतदारसंघाला मिळाले आहे. त्याचा फायदा मतदारसंघाला मोठया प्रमाणावर होणार आहे. महायुतीच्या माध्यमातून येत्या पाच वर्षांत तालुक्यात मोठया प्रमाणावर विकास कामे मार्गी लागणार आहेत.
आगामी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत जनतेने महायुतीसोबत रहावे, असे आवाहन भाजपाचे राज्य कार्यकारणी सदस्य विश्वनाथ कोरडे यांनी केले. डॉ. भाउसाहेब खिलारी यांनी आ. दाते यांच्या कामाचा गौरव करत तालुका विकासाला गती येणार असल्याचे सांगितले. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.