२४ फेब्रुवारी २०२५ Ahilyanagar News : इतर देशात वयाच्या १०० व्या वर्षापर्यंत माणसे जगतात आणि कामेही करतात, आपल्याकडे दिवसेंदिवस आपले आयुष्य हे कमी होत चालले आहे. त्याचे अनेक कारणे आहेत आणि याला कुठेतरी थांबवायचे असेल तर इतिहास वाचा, संताचे विचार ऐका त्यासाठी दररोज स्वच्छ पाणी प्या, भरपूर झाडे लावा,
आपल्या मुलांना चांगले शिक्षण आणि संस्कार द्या. गावात स्वच्छता ठेवा, गावातील म्हाताऱ्या माणसांना जीव लावा आणि इतरांवर जळण्याची प्रवृत्ती बंद करा निश्चितच यामुळे आपले आयुष्य वाढेल आणि आपण शंभर वर्षे जाऊ शकतो, असे प्रतिपादन पाटोदा गावचे आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी केले.

अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीतर्फे शिवजयंती निमित्त पाटोदा गावचे आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी आयोजित कार्यक्रमात भास्करराव पेरे पाटील हे बोलत होते. ते पुढे म्हणाले की, मेलेल्यांची राख नदीत टाकून पाणी खराब करु नका. त्याऐवजी काही खड्डे करून त्यात थोडी राख टाकून झाडे लावून त्या झाडांना जगवा. त्याने स्मृतीही जपता येतील आणि निसर्गही जपता येईल.
गावातील माणसांच्या सर्व शक्तींचा कल्पकतेने उपयोग करुन त्यांना सांभाळा. माणसे वळतात त्यांना वळण लावायला शिका.घरातील म्हाताऱ्या माणसाशी प्रेमाने बोला.त्यांचा सांभाळ करण्यातच खरी प्रतिभा आहे.गावचा सरपंच होणं सोपं असतं,परंतु पूर्ण गाव सांभाळणे हे इतके सोपे नाही, समाजात परिवर्तन करायचे असेल तर त्यासाठी साम, दाम, दंड, भेद हे देखील वापरावे लागते, सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायतीचे सदस्य हे आपले गावचे विठ्ठल-रुक्माई असतात आणि जे इतरांसाठी जगतात त्यांचीच समाज नोंद घेतो दुसऱ्यासाठी जगणाऱ्यांना समाज कधीच विसरत नाही.यावेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.