२४ फेब्रुवारी २०२५ Ahilyanagar News : साईबाबांच्या दर्शनासाठी गुजरात राज्यातून आले होते. मात्र शिर्डीत त्यांच्यासोबत चोरीची घटना घडली होती.परंतु पोलिसांनी या साईभक्त दाम्पत्याचे चोरीला गेलेले १ लाख ७० हजारांचे सोन्याचे दागिने त्यांना नुकतेच परत केले.त्यामुळे या दाम्पत्याच्या डोळ्यात आनंदाश्रू आले होते.
गुजरातमधील साईभक्त राकेशकुमार ओहरा आणि त्यांच्या पत्नी अंजनाबेन ओहरा २२ डिसेंबर रोजी साई दर्शनासाठी शिर्डीला आले होते.दर्शनासाठी गेल्यानंतर त्यांच्या चारचाकी वाहनाची काच फोडून चोरट्याने २६ ग्रॅम सोन्याची चैन आणि एक घड्याळ असा एकूण १.७० लाख रुपयांचा ऐवज लंपास केला.

शिर्डी पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करून संशयित आरोपींना अटक केली आणि मुद्देमाल हस्तगत केला. न्यायालयाच्या आदेशानुसार, पोलीस उपअधीक्षक शिरीष वमणे आणि पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे यांच्या उपस्थितीत ओहरा दाम्पत्याला त्यांचा ऐवज परत करण्यात आला.
मुद्देमाल परत मिळाल्यावर अंजनाबेन ओहरा यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू उभे राहिले. त्या म्हणाल्या, ”चोरी गेल्यानंतर आम्हाला खूप वाईट वाटले. मुद्देमाल परत मिळणार नाही असे वाटत होते. मात्र, साईबाबांची कृपा आणि शिर्डी पोलिसांचे अथक प्रयत्न यामुळे आमचे सोने परत मिळाले, याचा खूप आनंद झाला.”
शिर्डी पोलिसांच्या या त्वरित कारवाईचे भाविक आणि स्थानिक नागरिकांकडून कौतुक होत आहे.साईभक्तांच्या सुरक्षेसाठी आणि कायदा सुव्यवस्थेसाठी पोलिसांनी केलेले हे उल्लेखनीय कार्य निश्चितच प्रेरणादायी आहे.