२४ फेब्रुवारी २०२५ श्रीरामपूर : सर्वसामान्य नागरिकांवर श्रीरामपूर नगर परिषदेने हाती घेतलेल्या अमृत २ विस्तारित पाणीपुरवठा योजनेचा भुर्दंड नको.शिवाय या योजनेमार्फत नळ कनेक्शन लावण्यासाठी येथील नागरिकांकडे पैशांची मागणी केली जात होती.याबद्दल जनतेकडून तक्रारी येत असल्याचा खुलासा आमदार हेमंत ओगले यांनी केला आहे.जनतेकडून तक्रारी मिळाल्यानंतर आमदार हेमंत ओगले आणि करण ससाणे यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांची भेट घेतली आणि मिळालेल्या तक्रारींची माहिती दिली आहे.
या ठिकाणी सचिन गुजर, अध्यक्ष अण्णासाहेब डावखर, आशिष धनवटे हे देखील उपस्थित होते.त्यावेळी बोलताना आमदार ओगले म्हणाले, श्रीरामपूर नगर परिषदेकडून १७८ कोटींचे सुधारित पाणीपुरवठा योजनेचे काम हाती घेतले असून शहरातील जनतेला नवीन नळ कनेक्शन बसवण्याच्या नावाखाली चार ते पाच हजार रुपयांची मागणी ठेकेदार करत असल्याचे लोकांच्या लक्षात आले आहे.

याबद्दल बऱ्याच लोकांनी अनेक तक्रारी केल्या असून जनतेमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली असून मुख्य ठेकेदाराकडून नेमण्यात आलेल्या काही ठेकेदारांकडून नवीन टाकलेल्या लाईनवरून नळ कनेक्शनसाठी सर्रास हजारो रुपयांची मागणी नागरिकांकडे केली जात आहे.एका बाजूला करोडो रुपयांची योजना राबवायची आणि दुसऱ्या बाजूला सामान्य जनतेकडून नळ कनेक्शन बसवण्याच्या नावाखाली हजारो रुपये वसूल करायचे ! हे कसले धंदे चालू आहे ? असा प्रश्न श्रीरामपूरचे आमदार हेमंत ओगले यांनी उपस्थित केला.
पैशांची मागणी केलयास तक्रार करावी : मुख्याधिकारी
मुख्याधिकारी घोलप यांची भेट घेतल्यावर,जनतेने ठेकेदार किंवा त्याच्याकडून नेमलेल्या कोणत्याही व्यक्तीला कुठलीही रक्कम नळ कनेक्शनच्या नावाखाली देऊ नका किंवा या प्रकारे कोणी पैशांची मागणी करत असेल तर त्याबद्दल लगेच नगरपरिषदेला कळवावे.मिळालेल्या तक्रारीची चौकशी आणि खात्री करुन सबंधित व्यक्तीवर कारवाई केली जाईल, असे मुख्याधिकारी घोलप यांनी सांगितले.