सर्व लाभार्थ्यांना घरकुलाचा फायदा मिळवून देण्याची जबाबदारी माझी : आ.खताळ

Published on -

२४ फेब्रुवारी २०२५ संगमनेर : संगमनेर तालुक्यातल्या ७ हजार १४५ घरकुल लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर पहिला हप्ता ऑनलाइन जमा करण्यात आला त्याबद्दलचे प्रमाणपत्र लाभार्थ्यांना आमदार खताळ यांच्या हस्ते दिले गेले.या कार्यक्रमाच्या वेळी ते बोलत असताना त्यांनी नागरिकांशी संवाद साधला.

कार्यक्रमात बोलत असताना ते म्हणाले कि घरकुल वाटपाच्या संदर्भात या मागे तालुक्यात खूप राजकारण करण्यात आले होते.पण यापुढे घरकुलाच्या वाटपाचे काम पारदर्शीपणे केले जाणार असल्याचे तसेच ज्या व्यक्तीला खरंच घरकुलासाठी गरज असेल त्या गरजूंनाच घरकुलाचा फायदा मिळवून दिला जाईल असे आमदार अमोल खताळ यांनी सांगितले आहे.

आमदार खताळ म्हणाले, देशातल्या सर्व नागरिकांना स्वतःचे हक्काचे घर मिळाले पाहिजे अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना आहे.पण या आधीच्या काळात येथून मागे मंजूर झालेल्या घरकुलांचे काम पूर्ण करण्यात खूप अडचणी आल्या होत्या.पण आता येथून पुढील काळात घरकुले तयार करत असताना कोणतीच अडचण येणार नाही.याची मी जबाबदारी घेतो असाही विश्वास दिला.

या कार्यक्रमाला सहायक गटविकास अधिकारी राजेंद्र ठाकूर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश घोलप, गुंजाळवाडीचे भाजप नेते रोहिदास गुंजाळ, सार्वजनिक बांधकामचे उपअभियंता गणेश गुंजाळ, लघुपाटबंधारेचे उप अभियंता हितेंद्र गव्हाळे, कृषी अधिकारी वाळीबा उघडे व रामराव कडलग, विस्तार अधिकारी मदन शेवाळे, राजेंद्र कासार, काशिनाथ सरोदे, सदानंद डोखे, भाग्यश्री शेळके आदी यावेळी उपस्थित होते.

तसेच या कार्यक्रमाचे प्रस्ताविक व स्वागत प्रभारी गटविकास अधिकारी राजेंद्र ठाकूर यांनी केले तर सूत्रसंचालन कक्ष अधिकारी राजेश तिटमे यांनी करून उपस्थित मान्यवर आणि नागरिकांचे आभार मानले.संगमनेर पंचायत समितीच्या सभागृहामध्ये एकाच वेळी पुणे येथून केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार व ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत एकाच वेळी घरकुल लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर घरकुलांचा पहिला टप्पा अनुदान वर्ग केला गेला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe