अहिल्यानगरमध्ये हॉटेलच्या नावाखाली वेश्याव्यवसाय ! पोलिसांनी पकडला परप्रांतीय आरोपी

Published on -

नगर-सोलापूर महामार्गावरील वाकोडी फाटा येथे एका परप्रांतीय व्यक्तीने हॉटेलच्या आड वेश्याव्यवसाय चालवत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. भिंगार कॅम्प पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकत आरोपीला अटक केली असून, दोन महिला आणि एका अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आली आहे.

शहानवाज वाहाब आलम हुसेन (मूळ राहणार बिहार, सध्या सावेडी, तपोवन रोड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने ‘साईश्रद्धा’ नावाने हॉटेल सुरू करून महिलांना जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.

स्थानिक नागरिकांच्या संशयास्पद हालचालींबाबतच्या तक्रारीनंतर पोलिसांनी वाकोडी फाट्यावर छापा टाकला. यावेळी आरोपी हॉटेलमध्ये आढळून आला. चौकशीत त्याने वेश्याव्यवसाय चालवत असल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी असलेल्या दोन महिला आणि एका अल्पवयीन मुलीची सुटका केली.

भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

या कारवाईनंतर आरोपीविरुद्ध भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्र इंगळे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

नगर-सोलापूर महामार्गावरील दुसरी कारवाई

याआधी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रुईछत्तीसी शिवारातील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या कुंटणखान्यावर कारवाई केली होती. त्यामुळे नगर-सोलापूर महामार्गावरील काही हॉटेलमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe