शेतीत नवनवीन प्रयोग करून अधिक उत्पादन घेण्याच्या दिशेने शेतकरी वाटचाल करत आहेत. शहराजवळील जेऊर बहिरवाडी येथील संतोष दारकुंडे या युवा शेतकऱ्याने अशाच एका नावीन्यपूर्ण पद्धतीने शेवंतीची शेती केली आहे. अर्ध्या एकरातील शेवंती पिकाच्या वाढीसाठी त्यांनी २०० एलईडी बल्बचा वापर करून एक अनोखा प्रयोग यशस्वी केला आहे.
एलईडी बल्बच्या सहाय्याने प्रकाश देण्याचा प्रयोग
शेवंतीच्या चांगल्या वाढीसाठी पुरेशा प्रकाशाची गरज असते, विशेषतः हिवाळ्यात, जेव्हा रात्र मोठी आणि दिवस छोटा असतो. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी दारकुंडे यांनी एलईडी बल्बचा वापर केला. त्यांनी आपल्या गुलाबशेतीत आंतरपीक म्हणून शेवंतीची लागवड नोव्हेंबर महिन्यात केली आणि रोपांना प्रकाशाची उब मिळावी यासाठी २०० एलईडी बल्ब बसवले.

४० हजारांचा खर्च, सात लाखांचे अपेक्षित उत्पन्न
या प्रयोगासाठी त्यांना सुमारे ४० हजार रुपयांचा खर्च आला. मात्र, त्याचा परिणाम सकारात्मक दिसत असून शेवंतीच्या रोपांची झपाट्याने वाढ झाली आहे. एप्रिल महिन्यात शेवंतीच्या फुलांचा बाजारात मोठा तुटवडा असतो, त्यामुळे त्या काळात फुलांचा चांगला दर मिळण्याची शक्यता आहे. दारकुंडे यांच्या मते, या शेतीतून खर्च वजा जाता अंदाजे सात लाख रुपयांचे उत्पन्न मिळू शकते.
शेतकऱ्यांसाठी कुतूहलाचा विषय
रात्रीच्या वेळी अंधारात एलईडी बल्बमुळे संपूर्ण क्षेत्र प्रकाशमान दिसते. त्यामुळे हा अनोखा प्रयोग पाहण्यासाठी अनेक शेतकरी त्यांच्या शेताला भेट देत आहेत. जिल्ह्यात एलईडी बल्बच्या सहाय्याने शेवंती फुलवण्याचा हा पहिलाच प्रयोग असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.