महाराष्ट्र राज्य छत्रपती शिवाजी महाराजांचे आहे अन् त्यांच्याच राज्यात त्यांच्याच पुतळ्यासाठी शिवप्रेमींना झटावे लागते, यासारखे दुर्दैव नाही. आज अर्धाकृती पुतळा बसला, लवकरच या ठिकाणी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवण्यासाठी सर्वांनी एकजूट झाले पाहिजे. अतृप्त राजकारण्यांच्या विरोधापुढे झुकून एखादा अधिकारी जनरल डायर बनून पुतळा हटवण्यास आलाच, तर सर्वांनी छत्रपती होऊन त्याचा शाहिस्तेखान करून टाका. त्याशिवाय धर्म टिकणार नाही.
छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा अहिल्यानगरमध्ये बसवण्याचे काम चालू आहे. परवानगी असो वा नसो, छत्रपती संभाजी राजांचा पुतळा त्या ठिकाणी बसवणारच, त्यासाठी गटतट सोडून भगव्याखाली प्रत्येकाने एकत्र येण्याचे आवाहन आमदार संग्राम जगताप यांनी केले. भेर्डापूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बसवण्यावरून काही

अतृप्त राजकीय शक्तींनी या प्रकरणाला राजकीय वळण देत हिंदू धर्मीयांमध्ये गट पाडून प्रशासनाला महाराजांच्या मूर्ती बसवण्याविरोधात उभे केले. या प्रकरणात हिंदूंनी एक व्हावे, स्थानिक शिवप्रेमींना हिंदुत्ववादी राजकीय पाठबळ मिळावे, म्हणून राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग व नगरचे आमदार संग्राम जगताप यांनी भेर्डापूर गावात महाआरतीचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्याप्रसंगी जगताप हे बोलत होते.
ते म्हणाले की, संपूर्ण महाराष्ट्रच महाराजांचा आहे. त्यांची मूर्ती बसवण्यासाठी परवानगी घ्यावी लागते, यासारखे दुसरे दुर्दैव नाही. महाराजांची मूर्ती बसवण्याचा गावाने फक्त ठराव करावा, वरच्या पातळीवर त्याला पाठबळ द्यायचे काम आम्ही करूच, पण गावातील प्रत्येक हिंदूंनी एक होऊन गटतट विसरून एक झालं पाहिजे.
बसवलेल्या मूर्तीविरोधात कोणी प्रशासकीय अधिकारी जनरल डायरच्या रूपात गावात आलाच, तर आपण प्रत्येकाने शिवाजी महाराज होऊन त्या अधिकाऱ्याचा शाहिस्तेखान करण्याचे आवाहन जगताप यांनी केले. काही राजकीय शक्ती लोकसभा निवडणुकीत उदयास आल्या, त्यांनी आपल्याला जातीपातीत वाटून आपले ध्रुवीकरण केले, त्याचा फटका लोकसभा निवडणुकीत बसला.
अहिल्यानगर शहरात सध्या चालू असलेला छावा चित्रपट महिलांसाठी २४ तारखेपर्यंत मोफत दाखवण्यात येत आहे. आतापर्यंत दहा हजार महिलांनी हा चित्रपट बघितला असून, महिलांनी हा चित्रपट बघितल्यास ती महिला कुटुंबाला धर्माचे ज्ञान देते. त्या कुटुंबाला पुन्हा धर्म शिकवण्याची गरज पडत नसल्याचे मत जगताप यांनी मांडले.
राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग यांनी गावातील गटतट विसरून एक होण्याचे आवाहन केले. राजकारण म्हणून आम्ही धर्माचे कार्य करत नसून आपला धर्म जगला पाहिजे म्हणून आमची तगमग आहे, पण हिंदूच असे गटतटात विखरून आपली शक्ती वाया घालवत असतील तर त्याचा फायदा हिंदू विरोधी अधर्मी जिहादी उठवतात, असे ते म्हणाले. उपस्थित मान्यवरांचा भूषण कुटे, सचिन दांगट, अमोल राऊत, नितीन दांगट यांच्यासह ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.