नगर तालुक्यातील राजकिय समीकरणे बदलणार : तालुक्यात उबाठा गटाला मोठा हादरा : अनेक कट्टर कार्यकर्ते भाजपच्या गोटात

Published on -

Ahilyanagar News : जिल्ह्याच्या राजकारणात नेहमीच चर्चेचा विषय ठरलेल्या नगर तालुक्यात सध्या अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. यामुळेच आगामी काळात येथील राजकीय समीकरणे बदलणार असल्याची चिन्हे आहेत. नगर तालुक्यातील इमामपूर येथील विद्यमान सरपंच, उपसरपंच यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करून आमदार कर्डिले यांचे नेतृत्व मान्य केल्याने उबाठा गटाला मोठा धक्का बसला आहे.

इमामपूर गाव माजी जिल्हा परिषद सदस्य भाग्यश्री मोकाटे व माजी पंचायत समिती सदस्य गोविंद मोकाटे यांचे गाव आहे. येथील गाव पातळीवरील निवडणुका नेहमीच चुरशीच्या झालेल्या पाहावयास मिळत आहेत. गोविंद मोकाटे यांच्या गटाचे ग्रामपंचायत मध्ये सुमारे पंधरा ते वीस वर्षापासून एक हाती वर्चस्व होते. परंतु मंगळवार ( दि. २५) रोजी विद्यमान सरपंच बाजीराव आवारे, उपसरपंच लक्ष्मीबाई वाघमारे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी आमदार कर्डिले यांचे नेतृत्व मान्य करत भाजपमध्ये प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे

दरम्यान यावेळी बोलताना आमदार कर्डिले म्हणाले की, तुमच्या सारख्या सर्वसामान्य जनतेमुळेच मी आमदार झालो आहे. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना केवळ जनतेची कामे, सर्वसामान्यांचे प्रश्न, शेतकऱ्यांच्या समस्या सोडवत आल्यामुळेच मतदार माझ्यावर विश्वास दाखवत आहेत. सर्वसामान्यांच्या प्रश्नांबरोबर विरोधकही माझ्याकडे आले तरी मी त्यांचे काम मार्गी लावतो. कोणताही दुजाभाव करत नाही. मतदार संघातील सर्व नागरिकांचे प्रश्न मार्गी लावणे हे कर्तव्य आहे. इमामपूर गावच्या सर्व समस्या लवकरच मार्गी लावणार आहे.

सरपंच बाजीराव आवारे म्हणाले की, इमामपूर गावचा विकास पूर्णपणे खुंटला आहे. पाण्याचा, रस्त्याचा प्रश्न अनेक दिवसांपासून सुटलेला नाही. गावचा विकास करायचा असेल तर कर्डिले यांच्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळेच गावाच्या विकासासाठी कर्डिले यांचे नेतृत्व मान्य करत असल्याचे आवारे यांनी सांगितले.

तसेच गावातील विविध रस्ते व पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्याची मागणी केली. इमामपूर गावातील ठाकरे गटाच्या शिवसेनेचे कट्टर समर्थक असलेल्या असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे. यावेळी सुनील पवार, जेऊर माजी उपसरपंच बंडू पवार, आप्पासाहेब बनकर, उद्धव मोकाटे, मच्छद्रिं आवारे, चेअरमन शिवाजी काळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe