Ahilyanagar Breaking : २६ फेब्रुवारी २०२५ : राहुरी येथून कुस्तीच्या आखाड्यावरुन परत नगरला येत असताना निंबळक बायपास महामार्गाच्या कडेला लघुशंकेसाठी थांबलेल्या कुस्तीपटूला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली.यात या कुस्तीपटूचा जागीच मृत्यू झाला.ही घटना सोमवारी (दि. २४) पहाटे १.४५ च्या सुमारास घडली.मयूर कैलास तांबे (वय १९, रा. कर्जत, हल्ली रा. वाडिया पार्क तालीम, नगर) असे या कुस्तीपटूचे नाव आहे.
मयूर हा कुस्तीचे प्रशिक्षण घेण्यासाठी कर्जतहून नगरमध्ये आला होता.वाडियापार्क तालमीत कुस्तीचा सराव करत तो तेथेच इतर सहकाऱ्यांच्या समवेत राहात होता. रविवारी (दि.२३) तो त्याच्या अन्य सहकाऱ्यांसमवेत मोटारसायकलवर राहुरी येथे कुस्तीच्या आखाड्यासाठी गेला होता.

तेथून नगरकडे परतत असताना सोमवारी पहाटे १.४५ च्या सुमारास निंबळक शिवारात बायपास रस्त्यावर लामखडे पेट्रोल पंपासमोर रस्त्याच्या कडेला तो लघुशंकेसाठी थांबला. त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने त्याला धडक दिली.या धडकेत तो गंभीर जखमी झाला.अपघातानंतर अज्ञात वाहन पसार झाले.
त्याच्या पाठीमागून आलेल्या काही सहकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आल्यावर त्यांनी त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मयत घोषित केले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत मयूर याच्या पश्चात आई, वडील, विवाहित बहिणी असा परिवार आहे.