२६ फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : जाती धर्माच्या पलीकडे जाऊन नाथसंप्रदायाने सर्व समाजाला मानवजातीचा धडा दिला असून विविध समाजाचे लोक जसे कि, मुस्लीम, भटके, मागासवर्गीय, वंचित लोक नाथांची भक्ती करताना बघायला मिळतात.पण असे असूनही पाथर्डीमधील मढी ग्रामपंचायतीने मुस्लिम समाजातील लोकांना त्या गावच्या यात्रेत व्यवसाय करण्यावर बंदी लावण्यात आली असून या बद्दल ग्रामसभेचे अध्यक्ष व ग्रामसचिव यांच्याविरोधात धार्मिक तेढ निर्माण करणे तसेच संविधानाच्या आणि ग्रामसभेच्या कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सावित्री फातेमा सद्भावना मंचातर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी अशोक सब्बन, प्रतीक बारसे, युनूस तांबटकर, संध्या मेढे, फिरोज शेख, रवी सातपुते, राजेंद्र कर्डिले, अॅड. आरिफ भाई आदी उपस्थित होते.अनेक शतकापासून सुफी संत आणि नाथ सांप्रदाय हे मानवतेची आणि जीवब्रम्ह यांची सेवा करत आले आहे.नाथाची हीच परंपरा संत ज्ञानेश्वर माउलीपासून ते आज पर्यंत चालू आहे.जे लोक नाथांच्या विचारांविरोधात वागत आहेत त्यांना नाथांची शिकवण अजिबातच समजलेली नाही.

एका ठराविक समाजाने गावच्या यात्रेत व्यवसाय करण्यास बंदी घालणे असा ठराव करणे ही नाथ संप्रदायांच्या विचारांच्या विरुद्ध कृती आहे. कानिफनाथ महाराजांच्या यात्रेत कोणत्याही जाती, धर्माचा असलेला व समाज विघातक कृत्य करणाऱ्या व्यक्ती विरोधात कडक कारवाई करण्यात यावी.ग्रामसभेला घटनात्मक दर्जा प्राप्त झाला असला, तरी कोणत्याही जाती-धर्माच्या विरुद्ध असा ठराव बहुसंख्य मतदारांना ग्रामसभेत घेता येणार नाही,असे निवेदनात म्हटले आहे.