२७ फेब्रुवारी २०२५ संगमनेर : संगमनेरमध्ये फिल्मी स्टाईलने चोराने कट रचून पोलिसांना तपासापासून भटकवल्याची घटना समोर आली आहे.या चोराने पोलिसांना स्वतःच्याच चोरीची खोटी माहिती दिली आणि स्वतःच फिर्याद देऊन पोलिसांना येड्यात काढणाराच चक्क चोरांच्या टोळीचा म्होरक्या निघाला आहे.
या म्होरक्याला पोलिसांनी तावडीत घेतल्यामुळे घारगाव पोलिसांनी या घटनेचा पर्दाफाश केला आहे.पोलिसांनी साडे पंधरा लाखाच्या रक्कमेसह चार जणांना बेड्या ठोकल्या आहेत.३१ जानेवारी २०२५ रोजी मध्यरात्री म्हणजेच साधारण तीन आठवड्यापूर्वी फिर्यादी दीपक किसन कदम (वय ४२, रा. राजगुरूनगर, वाडा रोड, जि. पुणे) हा ५ हजार ७२ हजार २१४ रुपये किंमतीची शेतीच्या औषधांनी भरलेली पिकअप गाडी (क्र. एम. एच. ४२, एक्यु ८२७८) घेवून पुण्यावरून नाशिककडे जात होता तेव्हा त्याला त्याला चाळकवाडी टोल नाका येथे दोन प्रवाशांनी लिफ्ट मागितली.

त्या दोघांना घेऊन तो घारगाव पोलिस स्टेशन हद्दीत माहुली घाट खंदरमाळ या ठिकाणी आल्यावर रात्री साडेतीनच्या सुमारास लिफ्ट मागणाऱ्याला एका व्यक्तीला लघुशंका लागल्यामुळे कदम याने गाडी थांबवली.त्यावेळी गाडीत बसलेल्या दुसऱ्या व्यक्तीने गावठी कट्टा काढून चालकाच्या डोक्याला लावला.
तेव्हा गाडीच्या खाली उतरलेला दुसरा व्यक्ती ड्रायव्हरच्या बाजूने आत चढला.त्याने कदम यांच्या नाकास रूमाल लावला म्हणून तो बेशुध्द झाला आणि त्यानंतर फिर्यादीला थेट सकाळी शुध्द आल्यावर तो माल शोधत होता.पण गाडीमध्ये शेती मालाचे कोणतेही औषध त्याला सापडले नाही म्हणून त्याने गाडी मालकाला फोन करून झालेली घटना सांगितली आणि आळेफाटा पोलिस स्टेशन येथे जावून तक्रार केली.
मिळालेल्या तक्रारीवरून आळेफाटा पोलिसांनी झिरो नंबर गुन्हा दाखल केला. हा गुन्हा पुढील तपासासाठी घारगाव पोलिसांकडे दिल्यामुळे घारगाव पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास चालू केला.सदर गुन्ह्याच्या तपास पोलिस निरीक्षक दिगंबर भदाणे यांनी सहायक पोलिस निरीक्षक कल्पेश दाभाडे यांच्याकडे दिला होता.
त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक कल्पेश दाभाडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार झालेली घटना त्यांनी समजून घेतली आणि झालेला घटनाक्रम तपासला.त्याचप्रकारे हिवरगाव पावसा टोलनाका, चाळकवाडी टोलनाका येथील सीसीटीव्ही तपासले.
फिर्यादींचे मोबाईल क्रमांकाचे सिडीआर, कॉल डिटेल्स रेकॉर्ड काढण्यात आले. त्यावरून तांत्रिक विश्लेषण करून इतर संशयीत आरोपी बद्दल माहिती मिळवून त्यांचे मोबाईल क्रमांकांचे सिडीआर काढुन त्याबद्दल तपास करण्यात आला.
त्यानुसार तांत्रिक विश्लेषण करून उपलब्ध झालेल्या माहितीच्या आधारे तसेच गुप्त बातमीदारांच्या माहितीनुसार रोहकल (चाकण, ता. खेड, जि. पुणे) येथे पोलिस पथकाने आरोपी साईदास रघुनाथ गाडेकर (वय २७, रा. रोहकल, चाकण, ता. खेड, जि. पुणे. मुळ रा. निमगाव निघोज, ता. राहाता. जि. अहिल्यानगर) याला ताब्यात घेतले आणि त्याच्याकडे चौकशी करून तपास केला.त्यांनतर या घटनेची उकल करण्यात आली.
हा चोरीचा गुन्हा त्याचे इतर तीन साथीदार दीपक किसन कदम (वय ४२, रा. वाडा, राजगुरूनगर, जि. पुणे), तेजस प्रकाश कहाणे (वय २१, रा. वाडा, राजगुरूनगर, ता. खेड, जि. पुणे), नवनाथ दादाभाऊ शिंदे (वय २८, रा. रोहकल,चाकण, ता. खेड, जि. पुणे) यांनी मिळून केला तसेच त्याच्याकडून गुन्ह्यांतील जबरी चोरी गेलेला माल गाडी क्रमांक एम.एच.४२ एक्यु ८०७८ यामध्ये मिळून आल्याने तो जप्त केला आहे.
त्यानुसार इतर आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यानुसार फिर्यादी दीपक किसन कदम हाच गुन्ह्यांतील मुख्य आरोपी असल्याचे स्पष्ट झाले आहे.त्याची सखोल चौकशी केल्यावर त्याने गुन्हा कबुल केला,त्यानंतर त्या चौघांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.
सगळ्या आरोपींना संगमनेर न्यायालयासमोर हजर केल्यावर न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून या आरोपींकडुन गुन्ह्यातील पिकअप गाडी, ५ मोबाईल, ५ लाख ७२ हजार २१४ रुपये किंमतीची शेतीची औषधे असा एकूण १५ लाख १२ हजार २१४ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.ही कारवाई धारगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिगंबर भदाणे, सहायक पोलिस निरीक्षक कल्पेश दाभाडे, पोलिस हवालदार एकनाथ खाडे, चांगदेव नेहे, सुभाष बोडखे, समर्थ गाडेकर यांनी केली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक कल्पेश दाभाडे हे करीत आहेत.