मुंबई, नवी मुंबईनंतर येते तिसरी मुंबई ! देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

नवी मुंबईतील 'तिसरी मुंबई' ही देशाच्या आर्थिक आणि तंत्रज्ञान प्रगतीसाठी मैलाचा दगड ठरणार आहे. महाराष्ट्र राज्याला AI आणि नवसंशोधनाचे केंद्र बनवण्याचा हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा प्रयत्न आहे. यामुळे राज्यातील उद्योग, माहिती तंत्रज्ञान आणि डिजिटल क्रांतीस नवसंजीवनी मिळणार आहे.

Published on -

Mumbai News : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरात ‘तिसरी मुंबई’ उभारण्याची घोषणा केली आहे. ही ‘इनोव्हेशन सिटी’ देशातील सर्वात आधुनिक आणि विकसित शहरांपैकी एक असेल. तब्बल ३०० एकर क्षेत्रात ही सिटी विकसित केली जाणार असून, येथे तंत्रज्ञान, नाविन्यपूर्ण संशोधन, आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) या क्षेत्रांवर विशेष भर दिला जाणार आहे.

नॅसकॉम टेक्नॉलॉजी अँड लीडरशिप समिटमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांची नॅसकॉमचे श्रीकांत वेलामकन्नी यांनी मुलाखत घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील AI आणि तंत्रज्ञान क्रांतीला गती देण्याचा संकल्प व्यक्त केला. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने प्रशासन व अर्थव्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र सरकार वेगाने पुढे जात आहे. मुंबई विद्यापीठात ‘AI सेंटर’ स्थापन करण्यात आले आहे, तसेच जागतिक आर्थिक मंचाच्या सहकार्याने इंडस्ट्री केंद्र विकसित केले जात आहे.

तिसऱ्या मुंबईचे वैशिष्ट्ये

  • ३०० एकर क्षेत्रामध्ये आधुनिक शहराचे नियोजन
  • तंत्रज्ञान व नाविन्यपूर्ण संशोधनावर भर
  • डेटा सेंटर, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि स्टार्टअप इकोसिस्टमला चालना
  • हरित ऊर्जेच्या माध्यमातून शाश्वत विकास

महाराष्ट्राची ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे वाटचाल

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, महाराष्ट्राने १ ट्रिलियन डॉलरपर्यंत अर्थव्यवस्था नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी नीती आयोगाच्या सहकार्याने नवीन आर्थिक रोडमॅप तयार करण्यात आला आहे. विशेषतः मुंबई महानगर क्षेत्राला (MMRDA) १.५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

देशातील ६०% डेटा सेंटर्स महाराष्ट्रात आहेत, तसेच नवी मुंबईत डेटा सेंटर पार्क विकसित केले जात आहे. याशिवाय, २०३० पर्यंत महाराष्ट्रातील ५०% वीजनिर्मिती हरित ऊर्जेवर आधारित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मुंबई ही भारताची ‘फिनटेक राजधानी’ असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

तंत्रज्ञान आणि शेती क्षेत्रातील सुधारणा

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, डिजिटल सेवांचे प्रमाण वाढल्यामुळे बहुतांश शासकीय सेवा ऑनलाइन उपलब्ध आहेत. शेती क्षेत्रातही ‘अ‍ॅग्री-स्टॅट’ उपक्रमाद्वारे शेती प्रक्रियेचे डिजिटलायझेशन केले जात आहे. ‘ड्रोन शक्ती’ कार्यक्रमांतर्गत कृषी क्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करून फवारणी खर्च कमी करण्याचा मानस आहे.

कुंभमेळ्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान

२०२७ मध्ये नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी गर्दी व्यवस्थापन, सुरक्षा आणि आभासी अनुभव यासाठी अत्याधुनिक उपाययोजना करण्यात येणार आहेत. याशिवाय, उत्तर प्रदेशातील महाकुंभमेळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी त्यांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचेही कौतुक केले.

महाराष्ट्रातील औद्योगिक प्रगती

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक येथे ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स (GCC) विकसित केली जाणार आहेत. उद्योग आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांनी आपले योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe