Ahilyanagar News: तहसीलदारांनी गोरगरिबांच्या हक्काचे रेशनचे धान्य काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जात असलेला पीकअप ताब्यात घेत त्याच्याकडून ५५ हजार ९०० रुपयांच्या ४३ धान्याच्या गोण्या व एक पांढऱ्या रंगाची पीकअप असा एकूण २ लाख ५५ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी पिकअप चालकासह एकूण चार जणांविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमेश पोपट बांगर (रा. मोहा), विष्णु टकले, आशोक टकले (पुर्ण नाव माहीत नाही) (दोघे रा.बटेवाडी) व वाहनचालक लखन सतिश क्षीरसागर (रा. साकत फाटा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, दि.२४ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री अकरा वाजताच्या सुमारास वाहनचालक लखन सतिश क्षीरसागर हा पांढऱ्या रंगाच्या पीकअप (क्रमांक एमएच १२ एम.व्ही ७२४३) या वाहनातून रेशनचे धान्य काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जात असल्याची माहिती जामखेडचे तहसीलदार गणेश माळी यांना समजली. त्यांनी तातडीने आपल्या पथकासह या वाहनाचा पाठलाग केला असता सदरचे वाहन विंचरणा नदीच्या जुन्या पुलावरून जांबवाडी रोडकडे गेले असल्याचे समजले. त्यानुसार जांबवाडी रस्त्यावरील स्मशानभूमीजवळ सदरचा पीकअप ताब्यात घेतला. या पीकअपची तहसीलदार माळी यांनी तपासणी केली असता त्यात अत्यावश्यक वितरण व्यवस्थेच्या तांदळाचे ४३ कट्टे मिळुन आले. या गोण्यांवर गव्हमेंन्ट ऑफ पंजाब असे नाव लिहिले होते.
यानंतर सदरचे वाहन व धान्य जामखेड पोलीस स्टेशनला आणले. या प्रकरणी शासकीय धान्य गोदामाचे गोदामपाल बाळु गोविंद भोगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील चौघांविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड पोलीस करत आहेत.
काळ्या बाजारात विक्रीसाठी गेलेले धान्य हेच पुन्हा शहरातील काही धान्याच्या दुकानात राजरोसपणे विक्री करण्यात येते. काळ्या बाजारात विक्री करणारे आरोपी व काही ठराविक धान्याचे दुकानदार यांच्या संगनमताने हा गोरखधंदा चालतो. हेच धान्याचे दुकानदार हे रेशनचे धान्य चढ्या भावाने विक्री करुन या गोरगरीब ग्राहकांची लुट करतात. याबाबत सदर पकडलेले धान्य कोठून आले व ते कोणास विकणार होते याबाबत काय चौकशी होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.