काम सोडणाऱ्या कामगारास हॉटेल व्यावसायिकाने खोलीत कोंडून ठेवले मात्र पुढे घडले असे काही..

Published on -

Ahilyanagar News: सध्या बहुतेक ठिकाणी कर्मचाऱ्यांची वानवा आहे. त्यामुळे जे कर्मचारी आहेत त्यांच्यावरच अवलंबून राहावे लागत आहे. अशात अनेक एक काम सोडून दुसरीकडे जातात त्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यासाठी कर्मचाऱ्यांनी काम सोडू नये यासाठी सर्वजन सावध असतात,

हॉटेलमध्ये आचारी म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने काम सोडू नये म्हणून हॉटेल व्यवसायिकाने त्यास चक्क खोलीत कोंडून ठेवल्याची घटना नगर दौंड रोडवरील अरणगाव येथे घडली. याबाबत राम बबन सोनवणे (रा.भीमानगर, ता.माढा, जि.सोलापूर) याने नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

राम सोनवणे हा नगर दौंड रोडवरील हॉटेल यशांजली येथे बऱ्याच दिवसापासून आचारी म्हणून काम करत होता. परंतु त्याला हॉटेलमध्ये काम करायची इच्छा नसल्याने हॉटेलचे काम सोडून जायचे आहे असे त्याने हॉटेल मालकास सांगितले. यावर त्याने काम सोडून जाऊ नये म्हणून हॉटेल मालक शरद ढमढेरे (पूर्ण नाव माहित नाही, रा. अरणगाव ता.नगर) यांनी त्यास दि.१ ते १० डिसेंबर २०२४ दरम्यान खोलीत कोंडून ठेऊन त्यास शारीरिक व मानसिक त्रास दिला.

या त्रासाला कंटाळून निघून जाण्याकरिता सोनवणे याने खोलीच्या खिडकीतून उडी मारून बाहेर जाण्याचा प्रयत्न केला असता तो खाली पडून त्याच्या हाताला पायाला पाठीला मार लागल्याने तो जखमी झाला. याबाबत पुण्यात उपचार घेताना त्याने बंडगार्डन पोलिस ठाण्यात जबाब दिला. त्याबाबत ची कागदपत्रे नगर तालुका पोलिसांना प्राप्त झाल्यावर त्यांनी हॉटेल मालक शरद ढमढेरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe