Ahilyanagar News : अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यात ‘ध्येय मल्टीस्टेट’च्या शाखा सुरु करून ठेवीदारांना ज्यादा परताव्याचे आमिष दाखवत कोट्यावधी रुपयांच्या ठेवी गोळा करून त्या परत न देता सर्व शाखा बंद करून ठेवीदारांची कोट्यावधींची फसवणूक केल्याच्या दाखल गुन्ह्यातील आरोपी ‘ध्येय’ चा व्हाईस चेअरमन रोहिदास सत्यदेव कवडे (रा. गुलमोहोर रस्ता, सावेडी) याला अखेर ९ महिन्यांनंतर तोफखाना पोलिसांनी पकडले आहे.
त्याला मुंबईच्या बदलापुर येथून ताब्यात घेण्यात आले आहे. नगर शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी ‘ध्येय मल्टीस्टेट’च्या शाखा सुरु करून जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून व नंतर कोणत्याही प्रकारचा परतावा न देता सर्व शाखा बंद करून ११२ ठेवीदारांचे ५ कोटी ७८ लाख ६५ हजार रुपयांचा अपहार केल्याचे समोर आले होते.

या प्रकरणी ठेवीदार सुजाता संदीप नेवसे (रा. शिंदे मळा, सावेडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पतसंस्थेचा चेअरमन विशाल लक्ष्मण भागानगरे , व्हा. चेअरमन रोहिदास सत्यदेव कवडे, संचालक व सीईओ राहुल बबन कराळे यांच्या सह ४ संचालक अशा ७ जणांविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
गुन्हा दाखल झाल्यापासून गेल्या ९ महिन्यापासून सर्व आरोपी फरार झालेले होते. यातील २ संचालकांना न्यायालयाने अटकपूर्व जमीन मंजूर केलेला आहे. तर इतर ५ जण मोकाट होते. त्यामुळे ठेवीदारांमध्ये पोलिस तपासाबाबत तीव्र नाराजी पसरलेली होती. त्यामुळे अखेर ९ महिन्यानंतर यातील एक आरोपी का होईना पकडला गेला आहे.