बिबट्याच्या हल्ल्याने परिसरात भीतीचे वातावरण, पिंजऱ्याच्या मागणीने घेतले जोर

Published on -

बेलापूर मध्ये गळनिंब जाटेवस्ती येथे तेरा वर्षीय सार्थक मुक्ताजी जाटे या मुलावर बिबट्याने प्राणघातक हल्ला केला.ही घटना २७ फेब्रुवारीच्या रात्री साडेआठच्या सुमारास चांडेवाडी-राजुरी रोडवर घडली.सार्थक आपल्या वडिलांसोबत दुचाकीवरून घरी परतत असताना बिबट्याने अचानक हल्ला करून त्याच्या पायाला जबरदस्त चावा घेतला. या हल्ल्यात त्याला गंभीर जखमा झाल्या असून त्याच्यावर लोणी येथे उपचार सुरू आहेत.

बिबट्यांचा हल्ला वाढला,गावकऱ्यांमध्ये दहशत

या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.शेतांमध्ये ऊसतोड चालू असल्याने बिबट्यांना लपण्यासाठी जागा मिळत नाही,परिणामी ते सैरभैर होत लोकवस्तीकडे वळत आहेत. लहान मुले, वयस्कर व्यक्ती आणि एकटे फिरणारे लोक यांच्यासाठी हा धोका मोठा आहे. वनविभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि सुरक्षेच्या उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे.

गावकऱ्यांकडून वनविभागाकडे पिंजऱ्याची मागणी

बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाने त्वरित पिंजरा बसवावा, अशी मागणी गळनिंब गावचे सरपंच शिवाजी चिंधे यांनी केली आहे. मागील काही महिन्यांत बिबट्यांचे हल्ले वाढल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक प्रशासन आणि वनविभागाने त्वरित कारवाई करावी, अशी मागणी गावकरी करत आहेत.

पाच वर्षांपूर्वीच्या दुर्दैवी घटनेची पुन्हा आठवण

ही घटना घडल्यानंतर गावकऱ्यांना पाच वर्षांपूर्वीची एक भयानक घटना पुन्हा आठवली आहे. त्या वेळी गळनिंब शिवारात तीन वर्षीय ज्ञानेश्वरी नामदेव मारकड या चिमुरडीचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला होता. ज्ञानेश्वरी आपल्या आजीच्या कुशीत खेळत असताना बिबट्याने तिच्यावर हल्ला करत तिला आजीच्या हातातून ओढून नेले होते. या घटनेने संपूर्ण गावाला हादरवून सोडले होते.

वनविभागाकडून सतर्कतेचे आवाहन

सध्या बिबट्यांचे हल्ले सातत्याने होत असल्याने गावकऱ्यांनी रात्रीच्या वेळी शक्यतो बाहेर पडू नये, लहान मुलांना एकटे सोडू नये, तसेच शक्य असल्यास गटागटाने प्रवास करावा, असे वनविभागाने सुचवले आहे. बिबट्याच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांनी उपाययोजना करण्याची गरज आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe